पुणे : समाजात सकारात्मक काम करणारा समाज अशी जैन समाजाची ओळख आहे. किल्लारीचा भूकंप, पुर परिस्थिती किंवा कोल्हापूरची अतिवृष्टी असो आपत्तीच्या वेळी जे घटक पहिल्यांदा मदतीला धावून जातात, त्यामध्ये जैन समाज नेहमीच पुढे असतो. तसेच वैद्यकीय, पर्यटन, शिक्षण किंवा कोणतेही धाडसी क्षेत्र असेल त्यातही जैन समाज पुढे असतो. प्रत्येकाने आपापल्या गरजा पूर्ण केल्या नंतर जो पैसा शिल्लक राहतो. त्यातील २ टक्के निधी हा समाजकार्यासाठी दिला पाहिजे. त्या मदतीमधून माणुसकी टिकून राहते, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे nilam gore यांनी व्यक्त केले.
महाश्वेता संघटनेच्या वतीने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र येथे ‘महाश्वेता जीवन गौरव पुरस्कार’ विधान परिषदेच्या डॉ. नीलम गो-हे यांच्या हस्ते उद्योगपती जवाहर मोतीलाल विरचंद शहा (मालेगांवकर) यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जैन विकास आर्थिक महामंडळ (राज्यमंत्री दर्जा) चे अध्यक्ष ललित गांधी, महाश्वेताचे अध्यक्ष सुभाष शहा, सचिव प्रदीप पारेख, कोषाध्यक्ष चंद्रकांत शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी राकेश लालचंद शहा, डॉ. दिपक विनोदकुमार शहा, राजेश भोगीलाल शहा, डॉ राजेश हिरालाल शहा, युवराज शहा, विलास जयंतीलाल शहा, शर्मिला राजेंद्र सुराणा, अनिता रणजीत शहा यांना सामाजिक कार्यातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची नियोजन व संचलन डॉ. शैलेश गुजर यांनी केले.
ललित गांधी म्हणाले, जैन समाज देशात सर्वाधिक इन्कम टॅक्स भरणार वर्ग आहे, मात्र त्याचवेळी काही लोक दारिद्रय रेषे खालील जीवन जगत आहेत हे चित्र मन हेलावणारे आहे. हे चित्र बदलण्यासाठी समाजातील व्यक्तींनी पुढे आले पाहिजे. आपल्या समाजाला अल्पसंख्यक दर्जा आहे मात्र त्याचा फायदा घेण्यासाठी समाजातील नागरिकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन गांधी यांनी केले.
सत्काराला ऊतर देताना जवाहर शहा यांनी महाश्वेताने अधिकाधिक लोकांना सामावून घ्यावे. संस्थेचे कार्यक्षेत्र मोठे आहे. त्याचा योग्य विस्तार करण्यासाठी मुंबई शहरात एककेंद्री होण्याऐवजी पुणे, कोल्हापूर मध्ये विकेंद्रीकरण करावे अशी सूचना केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष शहा यांनी केले. डॉ. दिपक विनोदकुमार शहा, युवराज शहा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश गुजर यांनी केले.