पुणे- शरद पवारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचे कान टोचले आहे. सरकारने मनोज जरांगे आणि ओबीसी आंदोलनकर्त्यांना काय कमिटमेंट केली आहे हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला आम्ही गेलो नाही. मात्र,सरकारने आरक्षणावर सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, हल्ली त्यांची (भुजबळ) दोन भाषणे छान झाली. त्यांनी दोन्ही भाषणामध्ये माझ्या विषयीची प्रचंड आस्था व्यक्ती केली. आणि त्याच्यानंतर ते मला भेटायला आले. मला दोन दिवस बरे नव्हतं. दोन दिवस ताप होता. त्यामुळे मी झोपून होतो. भुजबळ भेटायला आल्याचे कळल्यानंतर मी त्यांची भेट घेतली. त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी केल्या पाहिजे त्यात महाराष्ट्राचे हित आहे. शातंता निर्माण करण्यासठी तुमची गरज असल्याची मार्गदर्शन छगन भुजबळ यांनी मला केले आहे. , असे शरद पवार म्हणाले.
छगन भुजबळ यांनी बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जनसन्मान रॅलीमध्ये शरद पवारांवर टीका केली. मात्र, टीकेला 24 तास होण्याच्या आधी छगन भुजबळ हे शरद पवारांचे निवास्थान ‘सिल्वर ओक’वर पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते. या भेटीत काय घडले याची माहिती देताना शरद पवारांनी आपल्या खास शैलीत छगन भुजबळांना टोला लगावला.
मनोज जरांगे- पाटील आणि मुख्यमंत्र्यांचा संयुक्त कार्यक्रम मी पाहिला. म्हणजे त्यांचा काहीतरी डायलॅाग होता. ओबीसींचे आंदोलन सोडवण्यासाठी चार पाच मंत्री गेले होते. पण या दोन्ही ठिकाणी काय ठरले? जरांगे आणि ओबीसींना काय आश्वासन दिले हे जाहीर होत नाही तोपर्यंत बैठकीला जाण्यात अर्थ नाही.अंगाशी आल्यावर ते माझ्याकडे आले, असे म्हणत राज्यसरकारवर पवार यांनी टीका केली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे.विधान परिषदेच्या निकालानंतर एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागलेले आहे, तर दुसरीकडे मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. विधान परिषदेतील मविआची कामगिरी, शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव,राज ठाकरे, छगन भुजबळांनी घेतलेल्या भेटीवर पवारांनी भाष्य केले. एक वर्षांपूर्वी बंड करत शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना घरात जागा आहे का असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांना केला.यावर त्यांनी अगदी रोखठोक आणि तितक्याच सफाईदारपणे उत्तर दिले.नुसते उत्तर दिले नाही तर आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे अजित पवारांच्या ‘घरवापसी’बाबतचा सस्पेन्स कायम ठेवला.
अजितदादांसाठी घरात जागा आहे का? असा सवाल केला. त्यावर पवार म्हणाले, घरात सर्वांनाच जागा आहे. त्यानंतर पवारांना पक्षात अजितदादांना जागा असेल का? असा प्रश्न विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न करता पवारांनी पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. संघर्षाच्या काळात माझ्यासोबत जे मजबुतीने उभे राहिले त्यांना आधी विचारणार.घ्यायचं की नाही हे ते ठरवतील, असं शरद पवार यांनी स्पष्टच सांगून टाकलं.पुढं त्यांनी गुगली टाकत जर त्यांनी घ्यायचं ठरवलं तर… पण ह्या सगळ्या जर तर आहे अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
सुसंवाद कायम महत्वाचा
घरातील उमेदवार समोर असूनही सुप्रियाला बारामतीत मतदान केल्याशिवाय राहणार नाही हे मला माहिती होते.त्यामुळे घरातला उमेदवार असूनही सुप्रियाला बारामतीत ४० हजार मते जास्त पडली. त्याचे कारण माझा आणि मतदारांमधला सुसंवाद चांगला आहे. पवार म्हणाले, तुमचा बारामतीतील लोकांशी वर्षानुवर्षाचा संवाद कसा आहे,हे महत्त्वाचे आहे.लोकांशी पर्सनल संवाद ठेवला तर लोकं तुम्हांला विसरत नाही.पूर्वी 50 टक्के लोकांना मी नावाने ओळखायचो. आता तसं होत नाही. मतदार आल्यावर त्यांच्या वडिलांच्या नावाने ओळखतो. हा जनरेशन गॅप आहे. पण हा संवाद ठेवला तर लोक विसरत नाहीत, असं ठाम मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.