रहाटणी – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणारे उद्धव ठाकरे हे खरे गद्दार आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार बारणे व त्यांचे सहकारी हे तर खुद्दार आहेत, अशी कोटी करीत भाजपचे वरिष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवारी) टीकास्त्र सोडले. मावळातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोणत्या शिवसेनेत पैदा झाला, असा सवाल करीत उबाठाच्या दुटप्पीपणावर त्यांनी बोट ठेवले. महायुतीच्या विकासाच्या सुपरफास्ट गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन आहे. त्याला मावळची बोगी जोडण्याचे काम मतदारांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये रहाटणी येथील कापसे लॉन्स येथे महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात फडणवीस बोलत होते.
व्यासपीठावर खासदार बारणे, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, रामटेकचे खासदार कृपाल तुमने, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, बाळा भेगडे, आमदार महेशदादा लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख नीलेश तरस, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, आरपीआयच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत सोनकांबळे, शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, तसेच सदाशिव खाडे, रवींद्र भेगडे, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, नाना काटे, नामदेव ढाके, सुजाता पालांडे, चंद्रकांत नखाते, शीतल शिंदे, माई ढोरे, सुरेखा जाधव, राजेश पिल्ले, प्रमोद ताम्हणकर, राज तापकीर, मोरेश्वर शेडगे, मोरेश्वर भोंडवे, काळूराम बारणे आदी पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही गल्ली-बोळाची निवडणूक नाही. ही देशाची निवडणूक आहे. आम्ही विकासाचे मुद्दे मांडत असताना महाविकास आघाडी मात्र गद्दार, खुद्दार, बोके, खोके या पलीकडे बोलायलाच तयार नाही. काँग्रेस बरोबर जायची वेळ येईल, तेव्हा मी हे दुकान बंद करून टाकीन, असे वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या विचारांना हरताळ फासत सत्तेसाठी काँग्रेसशी हात मिळवणी करणारे उद्धव ठाकरे हे खरे गद्दार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार बारणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी कायम निष्ठा ठेवली आहे. त्यामुळे ते खरे खुद्दार आहेत.मावळमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाले आहेत. हा उमेदवार कोणत्या शिवसेनेत पैदा झाला आहे, असा सवाल फडणवीस यांनी केला