पुणे : मंथन फाऊंडेशन आणि महाएनजीओ फेडरेशन यांच्या वतीने एच. आय. व्ही. बाधित महिलांसोबत आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. गोमय रक्षासूत्र बांधत ९० महिलांनी रक्षाबंधन साजरे केले. गोमय रक्षासूत्र ही पर्यावरण पूरक राखी बांधत महिलांनी गोवंशाचे पालन, संवर्धन आणि रक्षणासाठी एक पाऊल उचलले.
‘महा एनजीओ फेडरेशन’चे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून या एच. आय. व्ही. बाधित ९० महिलांना ‘महा एनजीओ फेडरेशन’ संपूर्ण वर्षभर दर महिन्याला ‘पोषण आहार किट’ देण्यात येत आहेत. यावेळी त्यांना गोमय रक्षासूत्र बांधत महिलांनी त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. तसेच महिलांना ‘पोषण आहार किट’ यावेळी देण्यात आले.
यावेळी स्नेहा कलंत्री, संध्या शाह, पिंकी शाह, बबिता गोयल, ज्योती मालपाणी, सीमा सपकाळ, राजेश दिवटे, मंथन फाऊंडेशनच्या अध्यक्षा आशा भट, दीपक निकम उपस्थित होते. महा एनजीओ फेडरेशन’चे वरिष्ठ संचालक मुकुंद शिंदे, संचालक राहुल जगताप, सदस्य रवींद्र चव्हाण आणि अपूर्वा करवा, कोमल गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेखर मुंदडा म्हणाले, गोमय रक्षासूत्र या पर्यावरण पूरक असलेल्या राखीचे फायदेही खूप आहेत. पर्यावरणासाठी अनुकूल सकारात्मक ऊर्जा, रेडीएशन कमी करणे यासोबत हे रक्षासूत्र मातीमध्ये मिसळून खत तयार होते. त्यामुळे देशी गोवंशाचे पालन संवर्धन होते आणि गोशाळा स्वावलंबनासाठी सहकार्यही होते.
आशा भट म्हणल्या, मागील पाच वर्षांपासून देत असलेल्या ‘पोषण आहार किट’मुळे महिलांच्या आरोग्यात विशेष फरक पडला असल्याचे जाणवत आहे. केवळ सण साजरा करण्याचा हेतू नव्हता, तर सामाजिक आव्हानांना तोंड देत जगत असलेल्या महिलांमध्ये सकारात्मकता आणि सक्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. मंथन फाऊंडेशनच्या कविता सुरवसे यांनी प्रास्तविक केले.