पिंपरी –
भोसरी विधानसभा मतदार संघातील स्पाईन रोड येथील जय गणेश साम्राज्य व नारायण हट सोसायटीतील सदनिकाधारकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. तसेच, ‘कन्व्हेयन्स डीड’चे प्रश्नही सोडवण्यात येईल, असे आश्वासन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिले. त्यामुळे संबंधित सोसायटीधारकांना दिलासा मिळाला आहे.
नारायण हट सोसायटी आणि जय गणेश साम्राज्य सोसायटीतील पदाधिकारी, प्रतिनिधी यांनी आमदार महेश लांडगे व विकसक राजेश सांकला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध समस्यांबाबत बैठक घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, सोसायटीचे अंकुशराव गोरडे, संदीप बेंडुरे, डॉ. सुयोग तारळकर, सतीश भालेराव, मनोज पवार, निशिगंधा वाढाणे, उद्धव ढोले, संतोष धायबर, राकेश बेहरा संतोष भागवत, दीपक गवळी, शंकर शिंदे, युवराज पालकर, खंडू मोरे, अनिल नलवडे , विजय निमसे आदी उपस्थित होते.
यावेळी नारायण हट सोसायटीतील रो-हाऊस, शाळा क्रिडांगण, कार्यालय व उद्यान यांचे ‘कन्व्हेयन्स डीड’, रस्ते दुरुस्ती, स्ट्रिटलाईट, गुरुविहार सोसायटीकडील रस्ता, प्रशाला जवळील स्केटिंग ग्राउंडच्या जागेतील रस्ता विकसित करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
तसेच, जय गणेश सम्राज्य सोसायटीतील ‘कन्व्हेयन्स डीड’सह गणपती मंदिर, महादेव मंदिर, सभामंडप विकसक यांनी करुन द्यावे, अशी सूचना करण्यात आली. ड्रेनेजलाईन १८ इंच व्यासाची करणे, एफ-१ युनिट आणि एफ- २ युनिटमधील रस्ता पुणे-नाशिक महामार्गाला जोडून देणे. प्ले ग्राउंड, कम्युनिटी हॉल, स्ट्रिट लाईट, सभामंडप, सर्विस रोडवर सम-विषम पार्किंग सुविधा करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोसायटीधारक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील सर्वात मोठी सोसायटी असा लौकीक असलेल्या जय गणेश साम्राज्य सोसायटीसह नारायण हट, प्रिन्सेस व्हीडा या भागात ३ हजाराहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. सोसायटीधारकांच्या पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे. सोयायटीधारक व विकसक यांच्यातील सकारात्मक समन्वयाअभावी निर्माण होणाऱ्या समस्या तात्काळ सोडवण्याबाबत प्रयत्न करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.