पिंपरी (प्रतिनिधी) :- मतदारांनी संधी दिल्यानंतर मतदारसंघासाठी मिळणारा संसद निधी देखील पूर्णपणे खर्च करू शकत नाहीत. ते त्यांचे अपयश आहे. मतदारांचा आवाज उठविण्याऐवजी स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसले. त्यांना या निवडणुकीत घरी बसवा. रोजगार, शिक्षण, आरोग्य सुविधांवर तुमचा आवाज बनतील आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी तुमच्या सोबत राहतील ते महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून संसदेत पाठवा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या तथा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या वतीने वाकड येथे शनिवारी, (२७ एप्रिल) आयोजित डायलॉग ऑन डेव्हलपमेंट अँड डेमोक्रसी कार्यक्रमातून त्यांनी आयटीयन्ससोबत संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, मावळ लोकसभेचे प्रचारप्रमुख योगेश बाबर, शिवसेना महिला शहर संघटिका अनिता तुतारे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे, आआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र पदवीधर अध्यक्ष चेतन बेंद्रे, शहराध्यक्ष मीना जावळे, शिवसेनेचे विभागप्रमुख मचिंद्र देशमुख आदी उपस्थित होते.