पुणे- मावळ लोकसभा मतदासंघाकरीता सोमवार १३ मे रोजी मतदान होत असून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. ही मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.लोकसभा निवडणुकीअंतर्गत मतदानाच्या तयारीची माहिती माध्यमांना देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस उप अधीक्षक सत्य साई कार्तिक, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिंमत खराडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के आदी उपस्थित होते.मावळ लोकसभा मतदार संघातील मतदार संख्या, मतदान यंत्रांची आकडेवारी, मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, टपाली मतदानाची आकडेवारी, आचारसंहिता कालावधीत केलेली कारवाई, संवेदनशील तसेच विशेष मतदान केंद्रांची माहिती, मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या मनुष्यबळाची माहिती, गृहमतदानाची आकडेवारी, आदर्श मतदान केंद्रांची माहिती, वाहतूक आराखडा तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर असलेल्या विविध निर्बंध आणि त्याबाबतच्या नियमावलीबाबत दीपक सिंगला यांनी सविस्तर माहिती दिली. मावळ मतदारसंघात एकूण १६ संवेदनशील मतदान केंद्रे असून या मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सुमारे २ हजार ५६६ मतदान केंद्रांसाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक असे एकूण ११ हजार ४८४ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच २९१ सेक्टर अधिकारीदेखील नेमण्यात आले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय रविवार १२ मे रोजी मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्याचे वितरण केले जाणार आहे.