मांजरी – मांजरी येथील समाज विकास संस्थेच्या वतीने येथील जाई मंगल कार्यालयात राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून नैतिक शिक्षण परीषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेला उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त आय ए एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस हे उपस्थित होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवराच्या सन्मानानंतर समाज विकास संस्थेचे अध्यक्ष शिवराम कांबळे यांनी या परिषदेचे प्रास्ताविक केले त्यानंतर मांजरी ग्रामस्थांच्या वतीने प्रा. पुनम घुले यांनी या परिषदेला शुभेच्छा दिल्या. अविनाश धर्माधिकारी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले की, शासनात प्रशासनात विविध पद मिळतात आणि ती जातात ही मिळणारी पदं ही आळवावरच्या पाण्यासारखी असतात मात्र त्या पदावर राहून आपण काम काय केलं याला महत्त्व आहे त्या पदावर राहून दुःखितांचे अश्रू पुसले का अनैतिक बाबींना दूर ठेवले का आपल्या पदाचा नैतिकतेने वापर करून सर्वसामान्य माणसांचं हित जोपासलं का ज्या पदावर आपण राहिलो त्या पदाला न्याय दिला का आणि जर तो न्याय दिला तरच ते शाश्वत आहे. आज समाजाला खऱ्या अर्थाने नैतिक शिक्षणाची गरज आहे. निर्व्यसनी समाज निर्माण होणे विशेषता युवा पिढी आज व्यसनाच्या आहारी जात आहे व्यसनच करायचे आहेत तर चांगली व्यसन करा अभ्यासाचे व्यसन करा व्यायामाचे व्यसन करा प्रामाणिकपणाच व्यसन करा निस्वार्थ समाजसेवेचे व्यसन करा अशी व्यसन करा ज्यामुळे आपल्या देशाची मान उंचावेल. नैतिक शिक्षणावर भाष्य करीत असताना महाराष्ट्र आणि भारताच्या शैक्षणिक धोरणावर बोलावं लागेल मात्र सर्व काही सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा घर, कुटुंब, शाळा, कॉलेज, समाज या सर्व स्तरांवर नैतिक शिक्षणाचे नीतिमूल्य रुजायला हवेत आणि याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आई वडील जसे वागतात तसेच मुलंही वागण्याचा प्रयत्न करीत असतात नैतिक शिक्षण ही आज काळाची गरज बनली आहे त्यामुळे आज सर्वच स्तरांवरून या बाबींचा विचार होणं आवश्यक आहे.
त्यानंतर डॉ श्रीपाल सबनीस आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की संत ज्ञानेश्वरांच्या आळंदीत लहान बालकांचे लैंगिक शोषण करण्यात आलं. इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी आपल्याच वर्गातील मुलासोबत भांडण झाले म्हणून, बाथरूमच्या खिडकीचा काच काढून भर वर्गात दुसऱ्या विद्यार्थ्यांचा गळा चिरतो. पुणे शहरासारख्या ठिकाणी भर रस्त्यात एका महिलेला मारले गेलं, अनेक जण शेजारी उभे राहून बघतात टीव्हीवर एक दोन तीन असा घटनाक्रम दाखवला जातो, शेजारी उभे असणारे काहीही करत नाहीत केवळ बघ्याची भूमिका घेतात. मुलाला मोबाईल फोन घेऊन दिला नाही म्हणून मुलगा आईचा खून करतो. अशा अनेक घटना राज्यांमध्ये रोज घडत आहेत. हे काय चाललं आहे…? विद्यार्थिनी सोबत शिक्षकाचं लफडं कुटुंबात आई वडीलच एका कोपऱ्यात बसून मोबाईलवर रमलेले दिसतात. मुलगा एकीकडे मुलगी दुसरीकडे हे चित्र अतिशय वाईट आहे. नैतिक शिक्षण हे कुटुंबाकडून, शिक्षकाकडून, समाजाकडून मिळत असतं. यात सरकारची ही महत्त्वाची भूमिका असते पण याकडे सर्व स्तरातून दुर्लक्ष होत आहे. ही धोक्याची घंटा आहे आपण संतांचे विचार हरवलो आहोत की काय असा प्रश्न पडतो. यावर वेळीच जागृत होणं आवश्यक आहे आणि हा विचार नैतिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच मांडला जात आहे ही आनंदाचे बाब आहे. एक परिषद घेऊन हा प्रश्न मिटणार नाही. या विचाराचं लोन महाराष्ट्रभर गेलं पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून समाजाने पुढ येणं आवश्यक आहे असे ते म्हणाले दुसऱ्या सत्रात नैतिक शिक्षण ही काळाची गरज या विषयावर परिसंवाद घेण्यात आला यात बालकल्याण समिती अध्यक्षा डॉ रानी खेडीकर, लोकवीकास मंचचे अध्यक्ष विश्वनाथ तोडकर, योगेश कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. या परिसंवादाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर या परिषदेत सात ठराव मांडले ते सर्वानूमते संमत करण्यात आले
१) नैतिक मूल्यांचा आदर्श विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा यासाठी शिक्षकांनी कोणतेही व्यसन करू नये शाळेत किंवा शाळेच्या बाहेर व्यसन करताना आढळून आल्यास त्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी
२) विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांना पुरेशी झोप भेटणे आवश्यक आहे यासाठी सर्व शाळा या सकाळी नऊ वाजले नंतर सुरुवात कराव्यात.
३) शाळा महाविद्यालयाच्या पासून किमान एक किलोमीटरच्या आत कसलेही पान तंबाखू गुटखा सिगारेट मद्य आदी प्रकारची विक्री किंवा निर्मिती करणारे व्यवसाय बंद करावेत.
४) शाळेच्या अभ्यासक्रमात नैतिक मुल्यांचा स्वतंत्र तास सुरू करावा.
५) सर्व शाळांमध्ये चोरी, लबाडी, व्यसन, अन्याय, अत्याचार, व्याभिचार करणार नाही अशी २ मिनिटाची प्रतिज्ञा सुरू करावी
६) शाळेच्या वेळेत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मोबाईल बंदी करावी किंवा तो लॉकरमध्ये ठेवण्याची सक्ती करावी.
७) अशा प्रकारच्या नैतिक शिक्षण परीषदेचे आयोजन संपुर्ण राज्यात विभाग तालुका जिल्हा राज्य स्तरावर शाळांच्या सहकार्याने सुरू करण्यात यावे
हे एकूण सात ठराव घेण्यात आले असून हे ठराव राज्याचे शिक्षण खाते, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आदी ना पाठवले जाणार आहेत.
या परिषदेत वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या जयदीप चोपडे यांना युवा प्रेरणा, प्रथमेश देवकर यांना आदर्श शिक्षक, विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ प्यारामेडिकल सायन्स, कुंजीर पब्लिक स्कूल, स्पेक्ट्रम किड्स, यांना आदर्श शिक्षण संस्थेचा व साहित्य सम्राट संस्था यांना साहित्य साधना, अरूण दादा बेल्हेकर युवा राष्ट्रनीर्मान संस्थेला व्यसन मुक्ती, जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टला दिव्यांग सेवा, अर्चना शितोळे यांना यशस्वी महीला उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक , शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या परिषदेचे आभार प्रदर्शन कृष्णा घुले तर सुत्र संचलन शैलेंद्र बेल्हेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्र कुंजीर, राजेश आरणे, बाळासाहेब विभुते, हेमंत टोलीवाल, गिरीश टोलीवाल, श्रद्धा कांबळे, सिध्दांत कांबळे सहयोगी संस्था सह्याद्री प्रतिष्ठान, जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्ट, अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनीर्मान संस्था इंदिरा शिक्षण संस्था, नीव फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.
