घनकचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन
पिंपरी, : घनकचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने एका खासगी रुग्णालयाला ३५ हजारांचा तर एका खासगी कंपनीला ५० हजारांचा दंड केला आहे. जैववैद्यकीय कचऱ्याची नियमानुसार विल्हेवाट न लावल्यामुळे रुग्णालयाकडून तर सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्याप्रकरणी खासगी कंपनीकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘स्वच्छता सर्वेक्षण २०२४’ स्पर्धेत भाग घेतला असून त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची जोरदार तयारी सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ व कचरामुक्त राहावे, यासाठी नागरिकांमध्ये विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच कचरा जाळू नका, जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य व नियमानुसार विल्हेवाट लावा, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, कचरा घंडागाडीत टाका, घनकचरा व्यवस्थापन नियमाचे पालन करा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तसेच वारंवार आवाहन करून देखील घनकचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई महापालिकेने सुरू केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी जैववैद्यकीय कचरा टाकण्यास नियमानुसार बंदी आहे. पण भोसरी येथील ‘क ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ८ मधील इंद्रायणीनगर येथे खासगी रुग्णालयाने जैववैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला. त्यामुळे संबंधित रुग्णालयाकडून ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तसेच महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत चिखली येथील देहू-आळंदी रोड प्रभाग क्रमांक १ मधील शेलार वस्ती नजीक एका खासगी कंपनीला सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्या प्रकरणी ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमाचे पालन न करणाऱ्यांवर पुढील काळातही अशा स्वरुपाची कारवाई सुरू राहील, असेही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
………
कोट
आपले पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर राहावे, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध उपक्रम राबवत असते. घनकचरा व्यवस्थापन नियमाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती सातत्याने करण्यात येत आहे. पण त्यानंतरही या नियमाचे उल्लंघन केले जात असल्याचे प्रकार समोर येत असल्याने नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
…….
कोट
घनकचरा व्यवस्थापन नियमावली पाळणे हे प्रत्येक नागरिकाला बंधनकारक आहे. जे नागरिक या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने सातत्याने सुरू आहे. याबाबत जनजागृतीसाठी महापालिका विविध उपक्रम देखील राबवत असते. या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, तसेच घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करावे.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
……..
कोट
घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आगामी काळात ही मोहीम आणखी व्यापकपणे राबवली जाईल. तरी नियमांचे पालन करून नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे.
- सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका