पुणे- कोथरुड भागातील ‘बार बेरी’ बारमध्ये रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगा सुरु असतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. या बारचे बांधकाम अनधिकृत असूनही महापालिकेकडून कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर महापालिकेने या बारला नोटीस बजाऊन दोन दिवसांत अनधिकृत बांधकाम काढून घेण्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतरही बांधकाम काढून न घेतल्याने अखेर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या झोन ६ ने बारवर होतोडा चालवला.
पालिकेकडून शहरातील विविध भागातील अनधिकृत रुफ टॉप, हॉटेल आणि पब, बारवर कारवाईचे सत्र सुरु आहे. मात्र कोथरूड येथील रामबाग कॉलनीमध्ये एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने मोकळ्या जागेवर अनधिकृत बांधकाम करुन चालवणाऱ्या ‘बार बेरी’ ला केवळ महापालिकेने नोटीस दिल्याचे दिल्याचे समोर आले होते. परंतु राजकीय दबावापोटी कारवाई होत नसल्याचे बोलले जात होते. असा आरोप होताच महापालिकेच्या बांधकाम विभागाने बुधवारी या बार बेरीचे अनधिकृत बांधकाम पाडले. तसेच जोशी किचनवरही कारवाई करण्यात आली आहे.
रामबाग कॉलनीसारख्या निवासी भागात मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकाम करून त्या ठिकाणी बार सुरू केला होता. तेथे कोथरूड भागातील तरुण – तरुणींकडून रात्री उशिरापर्यंत गोंधळ घातला जात होता. बार बंद झाला तरी मद्यप्राशन केलेल्या ग्राहकांचा रस्त्यावर धिंगाणा घातला जात असल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याविरोधात नागरिकांनी स्थानिक राजकीय प्रतिनिधींकडे नागरिकांनी तक्रार केली होती. परंतु कारवाई न करता उलट या बारला पाठबळ मिळाल्याचे बोलले जात होते. दरम्यान, कोथरूड, कर्वेनगर येथे हॉटेल ,पत्राशेड व अनधिकृत बांधकामावर बांधकाम विकास विभाग झोन ६ ने पोलीसांच्या मदतीने धडक कारवाई करण्यात केली. या कारवाईमधे सुमारे २ हजार चौरस फूट इतके बांधकाम पाडण्यात आले. हॉटेल ‘बार बेरी’ येथील अनधिकृत आरसीसी बांधकाम व जोशी किचन येथील फ्रंट मार्जिनवर कारवाई केली. ही कारवाई पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता राजेश बनकर, बांधकाम विभाग झोन क्र.६ चे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप-अभियंता श्रीकांत गायकवाड, शाखा अभियंता-मुकेश पवार, कनिष्ठ अभियंता मनोजकुमार मते, सागर शिंदे, समीर गडाई व सहाय्यक गणेश ठोंबरे, राठोड, हृषीकेश जगदाळे, भावेश यांच्यासह पोलीस पथकाने, दोन गॅस कटर, एक ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांच्या सहाय्याने कारवाई केली.