पिंपरी : “माझं चुकलं तरी काय” असा प्रश्न विचारणारे एक पत्र चिंचवड मतदार संघामध्ये सध्या प्रत्येकाच्या चर्चेचा विषय झाला आहे. या पत्राने चिंचवड मतदार संघातील नागरिकांच्या अक्षरशः काळजाला हात घातला आहे. चिंचवड मतदार संघात कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना गतवर्षातील अनेक आठवणींना उजाळा देत नक्की “माझं चुकलं तरी काय” असा प्रश्न माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी थेट नागरिकांनाच विचारला आहे.
माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी घरोघरी पत्र पाठवले आहे. या पत्रातून त्यांनी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. भूमिपुत्र, कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी अशा भूमिकेतून जाताना या मतदारसंघातील विकासाचे व्हिजन, जे कागदावर होते त्याला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नात काही वेळेला नागरिकांची साथ मिळाली. काही वेळेला ही साथ कमी पडली. असे असतानाही कामाची तडफ कुठेही कमी होऊ दिले नाही असे नाना काटे यांनी पत्रात म्हटले आहे. 2007 ते 2024 या प्रदीर्घ कालावधीत ही भूमिका सातत्याने सुरूच आहे. यश- अपयश हा मुद्दा बाजूला ठेवून नागरिकांची सेवा आणि त्यांच्यासाठी समर्पण हेच उद्दिष्ट असताना नक्की “आपलं चुकलं तरी कुठे” असा प्रश्न नाना काटे यांनी पत्रातून नागरिकांना विचारला आहे.
—————
पत्रातून घराणेशाहीवर जोरदार हल्ला
या पत्रातून नाना काटे यांनी चिंचवड मतदार संघातील घराणेशाहीवर देखील जोरदार हल्ला चढवला आहे या पत्रामध्ये नाना काटे म्हणतात..”आज घराणेशाही असलेल्या दिशाहीन नेतृत्वामुळे सामान्य माणसाकडं दुर्लक्ष झालं. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचं स्वप्न भंग पावतंय की काय, अशी भीती निर्माण झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात विकासाचा वेग तुलनेनं मंदावलाय. आयटी सीटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात मागच्या काही वर्षांत वाहतुकीचा प्रश्न अतिशय बिकट बनलाय. त्याला वैतागून काही आयटी कंपन्यांनी स्थलांतराचा मार्ग पत्करलाय. यातून रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडविणे हा माझा प्राधान्यक्रम असेल. पुण्यातल्या कोरेगाव पार्कला लाजवेल, असा विकास पिंपळे सौदागरमध्ये झालाय. त्या पेक्षाही पुढं जाऊन मला संपूर्ण मतदारसंघ विकसित करायचाय. त्यासाठी पुन्हा निवडणुकीत उभा राहण्याचा संकल्प केलाय. पूर्वी माझं काय चुकलं, तेही समजून घ्यायचंय आणि आता त्यात काय सुधारणा करायला हव्यात, हेही जाणून घ्यायचंय. मी येतोय. तुमच्या सेवेसाठी. त्यासाठी तुमची साथ, शुभेच्छा व आशीर्वाद हवेत.