25.2 C
New Delhi
Thursday, April 24, 2025
Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला; पुराचा Pune rain धोका कायस्वरुपी दूर करण्याकरीता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्यावतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. शिंदे यांनी पाटील इस्टेट party estate शिवाजीनगर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी, जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळा, एकता नगर Ekta Nagar सिंहगड रोड, खडकवासला येथे भेट देऊन रहिवासी तसेच स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर,माधुरी मिसाळ,
अण्णा बनसोडे, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पुण्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर निळ्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्यात येईल. पूरबाधित नागरिकांना शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. परंतु, पुराचा धोका कायस्वरुपी कमी करण्याकरीता शासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येईल. पुरबाधित घराचा प्रश्न मार्गी लावण्याकरीता नवीन विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (डीसीआर) तयार करण्यात येईल, घराच्या पुर्नविकासकरीता आवश्यकतेनुसार कायद्यात व नियमातही बदल करण्यात येईल, असे आश्वासन श्री. शिंदे यांनी दिले.

जुनी सांगवी येथील पूरग्रस्तांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी सांगवी परिसरातील स्थलांतरित पूरबाधित नागरिकांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळेत भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. शासनाकडून सर्व आवश्यक ती मदत करण्यात येत असून बाधित क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले.यावेळी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्री. सिंह यांनी पूरग्रस्तांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

एकता नगर येथे मुख्यमंत्र्यांची भेट

सिंहगड रोडवरील एकता नगर येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच सुमारे दीड तास नागरिकांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यकता उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

त्यानंतर या भागातील गटार लाईनची दुरुस्ती, पाण्याची नवीन लाईन टाकणे आदी पायाभूत सुविधा नागरिकांना पुरवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगर पालिका आयुक्तांना दिले. पूरबाधित भागातील विविध भागात मदत कक्ष सुरू करण्यात आले असून आरोग्य पथके आणि जवळपासची रुग्णालये सज्ज ठेवावीत आदी सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरची त्यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.

श्री. शिंदे यांच्या हस्ते पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.


पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी समूह विकास, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी- मुख्यमंत्री शिंदे

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे (क्लस्टर) प्रस्ताव सादर करण्यासह झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आगामी काळात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी नद्यांची प्रवाक्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासह नद्यांमध्ये राडारोडा टाकून प्रवाहाला अवरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, प्रत्येक जीव आपल्याकरीता महत्वाचा असून तो वाचविणे आपले कर्तव्य आहे. नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण झाली पाहिजे, कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांना सेवा-सुविधा दिली पाहिजे. पूरपरिस्थितीमध्ये मनुष्यहानी, वित्तहानी टाळण्याकरीता नदीचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचे काम करावे. नद्यांमधील भराव काढणे, बांधकाम आणि इमारत तोडफोडीचा राडारोडा काढणे आदी उपाय तातडीने करावे. याकरीता पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जलसंपदा विभाग, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासनाने मोहीम राबवावी.

प्रत्येक गावात पावसाचे प्रमाण, प्रवाहात येणारे पाणी समजण्यासाठी स्वयंचलीत हवामान केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावा. पुराने बाधित होणाऱ्या क्षेत्रात तात्काळ सूचना देणारी प्रणाली (अर्ली वॉर्निंग सिस्टीम) तात्काळ कार्यान्वित करावी. या सर्व कामाकरीता निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही ते म्हणाले.

प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रस्तरावर जाऊन काम केल्यास नागरिकांचे अनुभव, प्रश्न, अडचणी समजण्यासह उपाययोजना करणे शक्य होते. नागरिकांना मदत करणे हे शासनाचे कर्तव्य असून त्यानुसार कपडे, अंथरुण, पांघरुन, किट, शिधा तातडीने पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी शासनाचा निधी, जिल्हा नियोजन समिती तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधी आदीतून विशेष मदत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे श्री.शिंदे म्हणाले.

पुरामुळे येणाऱ्या पाण्यातून साथीचे रोग पसरतात. साथीचे रोग पसरू नयेत म्हणून आरोग्य विभागाकडून चांगल्या प्रकारे उपाययोजना सुरू आहेत. पुरामुळे वाहनांच्या नुकसानीबाबत विमा कंपन्यांशी बैठक घेऊन वाहनमालकांना नुकसानभरपाई देण्याबाबत सूचना कराव्यात, असेही ते म्हणाले.

आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, नद्यांच्या पाणी वहनक्षमता, खोली व रुंदी, धरणातील येवा, नियंत्रित व अनियंत्रित पाण्याचा साठा, पाण्याचा विसर्ग, धरण आणि धरणाच्या खालच्या व वरील बाजूस येणारे पाणी आदी बाबींचा विचार करुन नदी खोलीकरण व रुंदीकरण करण्याची गरज आहे. पूरनियंत्रणाकरीता पुढील ५० वर्षाचा विचार करुन एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यावरही नदीच्या पाणी प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही, असे नियोजन करावे. याबाबत जिल्हास्तरीय यंत्रणेने विस्तृत माहिती घेवून आराखडा तयार करावा.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पूरग्रस्त भागातील नागरिकांना मान्सूनपूर्व सूचना देणारी प्रणाली तात्काळ अद्ययावत करावी. पुरामुळे नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना विशेष मदत करण्याबाबत विचार व्हावा. त्यांना जीवनाश्यक वस्तू उपलब्ध करुन देण्यात याव्यात, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या..

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी पुराच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच आगामी काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सज्ज असल्याचे सांगितले. जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी धरणातून सोडण्यात विसर्ग सोडण्याच्या कार्यपद्धतीची तसेच पूरनियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या आवश्यक त्या उपाययोजनांची माहिती दिली. मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शेखर सिंह यांनी नागरिकांचे तात्पुरत्या शिबीरात स्थलांतर, त्यांना पुरविण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली.

अमितेश कुमार, विनय कुमार चौबे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील खड्डे भरणे, वाहतूक नियंत्रण व पूरपरिस्थीतीत नागरिकांचे स्थलांतरण आदीबाबत माहिती दिली.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, सार्वजनिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
25.2 ° C
25.2 °
25.2 °
5 %
2.1kmh
0 %
Thu
41 °
Fri
42 °
Sat
42 °
Sun
42 °
Mon
40 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!