पिंपरी, पुणे -आपले कार्य सेवावृत्ती प्रमाणे करत राहिले की समाज हमखास दखल घेतो. आजच्या सामाजिक बदलांचा विचार केला तर समाजाला अनेक सेवाव्रतींची गरज आहे, असे मत सैन्यदलातील निवृत कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) प्रबंधक योगेश भावसार यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त श्रमिक पत्रकार भवन, पुणे येथील कार्यक्रमात निवृत कर्नल व नाम फौंडेशनचे सदस्य सुरेश पाटील, पँथर आर्मीचे अध्यक्ष फिरोज मुल्ला व पँथर आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष आठवले यांच्या हस्ते भावसार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अकरा व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.