पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अलिकडच्या काळात पुण्यात कोयता हातात घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गुन्हेगारीच्या ९ घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये १९ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी १३ आरोपी विधी संघर्षित बालके आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी शासन विविध उपाययोजना राबवीत आहे. पुण्यात सात नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये बाणेर, फुरसुंगी, काळे पडळ, आळेफाटा, खराडी, वाघोली आणि नांदेड फाटा पोलीस स्टेशनचा समावेश आहे. ही नवीन पोलीस स्टेशने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात मदतील ठरतील.
विधी संघर्षित बालकांसाठी ‘दिशा’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांचे पुनर्वसन केले जात आहे. विधी संघर्षित बालकांना सराईत गुन्हेगार गुन्हेगारी कृत्यांमध्ये उपयोगात आणत असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतीय न्याय संहितेमध्ये विधी संघर्षित बालकांचा असा उपयोग केल्यास सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा अधिकार आहे.
सीसीटीव्हीचे जाळे अधिक बळकट करण्यात येईल, ज्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे सोपे होईल. तसेच, अमली पदार्थांच्या विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी मोठी मोहीम सुरू आहे. या मोहीमेत गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
राज्यात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येईल. या युनिटच्या माध्यमातून भरमसाठ व्याजाच्या योजनांच्या जाहिरातींची माहिती घेऊन ठेवीदारांची फसवणूक टाळण्यात येईल.