पिंपरी- पिंपरी-चिंचवड, पुणे आणि पीएमआरडीए क्षेत्रांसाठी एकात्मिक दळणवळण विकास आराखडा (Comprehensive Mobility Plan – CMP) महामेट्रोच्या माध्यमातून अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील गरजांचा विचार करून आराखड्यात महत्त्वपूर्ण सुधारणा सुचवली. विशेषतः त्यांनी ‘पुणे मेट्रो’चा विस्तार करून ‘पुणे-पीसीएमसी मेट्रो’ म्हणून नामविस्तार करण्याची ठाम मागणी केली.

भक्ती-शक्ती ते वाकड मार्गे चाकण आणि वाकड ते कात्रज मेट्रो मार्गांची प्रस्तावना
आमदार शंकर जगताप यांनी या बैठकीत मेट्रोच्या भविष्यातील मार्गावर चर्चा करताना पिंपरी-चिंचवड व पुणे शहरासाठी समान मुद्रांक शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याचे सांगितले आणि यावर त्वरित पुनर्विचार करण्याची मागणी केली. तसेच, पिंपरी-चिंचवडसाठी मेट्रोचे दोन नवे मार्ग सुचवले:
- भक्ती-शक्ती ते वाकड मार्गे चाकण
- वाकड ते कात्रज
वाढती लोकसंख्या आणि उद्योगवसाहती लक्षात घेता या मार्गांचा भविष्यात मोठा उपयोग होईल, असे त्यांनी नमूद केले.
जलवाहतुकीचा पर्याय आणि इतर महत्त्वाच्या मागण्या
आमदार जगताप यांनी काही अन्य महत्त्वाच्या मागण्याही उपस्थित केल्या:
- पवना व इंद्रायणी नद्यांमध्ये जलवाहतुकीचा पर्याय तपासून तो आराखड्यात समाविष्ट करावा.
- मेट्रो स्थानकांबाहेर निशुल्क पार्किंगची व्यवस्था असावी आणि तिथे वाहनांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करणे.
- उद्योगनगरीतील मेट्रो पोल किंवा थांब्यांवर वारकरी संप्रदायाशी संबंधित चित्ररचनांचा समावेश करावा.
- हिंजवडी-वाकड भागासाठी स्वतंत्र एसटी स्थानकाची उभारणी व्हावी.
- स्मार्ट सिटीअंतर्गत उंचवलेले फुटपाथ रस्ते अरुंद करत आहेत, म्हणून वाहन गॅरेज आणि वाहतूक प्रवाह यावर परिणाम होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात.
- वाल्हेकरवाडी येथे रेल्वे ओव्हर ब्रिज आणि एमएम चौक काळेवाडी येथे ग्रेड सेपरेटर लवकर उभारावे.
चर्चासत्रात अनेक मान्यवरांची उपस्थिती
या चर्चासत्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, राजेंद्र गावडे, नामदेव ढाके, राजू दुर्गे, मारुती भापकर, सचिन चिखले, शर्मिला बाबर, शेखर चिंचवडे आणि धनंजय भिसे यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
महामेट्रोकडून तयार करण्यात येत असलेला हा आराखडा भविष्यातील वाहतूक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आमदार शंकर जगताप यांच्या सूचनांमुळे पिंपरी-चिंचवडच्या गरजांनुसार आराखड्यात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.