नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात कटुता वाढली आहे. आपने म्हटले आहे की, काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर करण्यासाठी आम्ही इतर पक्षांशी सल्लामसलत करू. काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्यावर अस्तित्वात नसलेल्या कल्याणकारी योजनांची आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने तक्रार दाखल केली आहे. यामुळे ‘आप’ने काँग्रेसवर नाराज व्यक्त केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजय माकन यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अँटी नॅशनल म्हणजेच देशविरोधी असल्याचे म्हटले आहे. यासोबतच अजय माकन यांनी, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत युती करणे ही काँग्रेसची मोठी चूक होती. ही चूक आता सुधारण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर आपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपने काँग्रेसला माकन यांच्यावर कारवाई करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केजरीवाल यांना ‘देशविरोधी’ संबोधल्याबद्दल माकन यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसने त्यांच्यावर २४ तासांच्या आत त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम आदमी पक्ष काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर करण्यासाठी अन्य पक्षांशी सल्लामसलत करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेवेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी उपस्थित होत्या.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले, भाजप संदीप दीक्षित यांच्यासह काँग्रेसच्या उमेदवारांना निधी पुरवत असल्याची माहिती ‘आप’ला मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने संदीप दीक्षित यांना अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात रिंगणात उभे केले आहे.