नवी दिल्ली- इलेक्टोरल बॉन्ड घोटाला देशभरात चर्चिला गेला होता. या द्वारे भाजपला सर्वाधिक पक्षनिधी मिळाला होता. दरम्यान, या वर्षी इलेक्टोरल बॉन्डमधून कुणाला किती पक्ष निधी मिळाला याची आकडेवारी पुन्हा समोर आली आहे. या आकडेवारीत भाजप पुन्हा एकदा तुपाशी असल्याचे सिद्ध झाले आहे. तर सर्वात कमी निधी काँग्रेस पक्षाला मिळाला त्यामुळे भाजप जोमात अन् काँग्रेस कोमात अशी अवस्था झाली आहे.२०२३-२४ वर्षात भाजपला निवडणूक रोख्यातून (इलेक्टोरल बॉन्ड) सर्वाधिक पक्ष निधी मिळाला आहे. भाजपला २,२४४ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. २०२२-२३ च्या तुलनेत हा निधी तिपटीने वाढला आहे. तर कॉँग्रेसला सर्वात कमी २८८.९ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
भाजपला २०२३-२४ मध्ये व्यक्ती, ट्रस्ट आणि कॉर्पोरेट कंपण्यांकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सुमारे २,२४४ कोटी रुपये मिळाले आहेत. तर काँग्रेसला केवळ २८८.९ कोटी रुपये मिळाले आहे. २०२३-२४ मध्ये देशभरातील विविध पक्षांना निवडणूक रोख्यांच्यामाध्यमातून मिळालेल्या देणगीची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. त्यात या वर्षात सर्वाधिक निधी हा भाजपला मिळाल्याचे उघड झाले आहे.
भाजप आणि काँग्रेसने घोषित केलेल्या एकूण देणग्यांमध्ये निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेल्या निधीच्या पावत्या समाविष्ट करण्यात आल्या नाहीत. कारण नियमांनुसार हा तपशील राजकीय पक्षांनी केवळ त्यांच्या वार्षिक आर्थिक ऑडिट अहवालात घोषित करणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांसाठी निधीचा प्राथमिक स्रोत म्हणून थेट किंवा निवडणूक ट्रस्टच्या मार्गाने मिळालेले योगदान सोडून, फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक बाँड योजना रद्द केली होती.
तथापि, काही प्रादेशिक पक्षांनी त्यांच्या २०२३-२४ च्या त्यांच्या आर्थिक योगदान अहवालांमध्ये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून स्वेच्छेने त्यांच्या पावत्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये बीआरएसचा समावेश आहे. बीआरएसला ४९५.५ कोटी रुपये रोख्यांच्या माध्यमातून मिळाले आहे. तर डीएमकेला ६० कोटी रुपये मिळाले आहे. वायएसआर काँग्रेसला १२१.५ कोटी रुपये मिळाले आहे. जेएमएमने रोख्यांच्या माध्यमातून ११.५ कोटी रुपयांच्या पावत्या जाहीर केल्या आहेत.
भाजपला २०२३-२४ मध्ये फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस कडून ३ कोटी रुपयांच्या देणग्या जाहीर केल्या आहेत. ही कंपनी सँटियागो मार्टिन यांच्या मालकीची आहे. ही कंपनी भारताची ‘लॉटरी किंग’ म्हणूनही ओळखली जाते. इलेक्टोरल बाँड्स मार्गाद्वारे फ्युचर गेमिंग हा सर्वात मोठा देणगीदार होता. तृणमूल काँग्रेस सर्वाधिक लाभार्थी होता. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली या कंपनीची ईडी आणि आयकर विभागामार्फत चौकशी सुरू आहे.
राष्ट्रीय पक्षांमध्ये, आम आदमी पार्टीला या वर्षात ११.१ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे घोषित केले आहे. गेल्या वर्षी त्यांना ९३७.१ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. तर सीपीएमला २०२२-२३ मध्ये ६.१ कोटी तर २०२३-२४ मध्ये ७.६ कोटी रुपये मिळाले. मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टीला १४.८ लाख रुपये मिळेल आहे. टीडीपीने या वर्षी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाल्याचे जाहीर केले आहे. तर बीजेडीला शून्य व समाजवादी पक्षाला गेल्या वर्षी ३३ कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी ४६.७ लाख रुपयांचे निधी मिळाला असल्याचे जाहीर केले आहे.