पिंपरी -श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ (swami samrth) प्रकटदिन उत्सवाची सांगता सोमवार, दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सुयश खटावकर आणि सहकारी प्रस्तुत ‘नाद अनाहत’ या सांगीतिक मैफलीने करण्यात आली. श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे संपन्न झालेल्या उत्सवाच्या अंतिम दिवशी खासदार श्रीरंग बारणे, भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष माधव भंडारी, विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे, आमदार लक्ष्मण जगताप, सामाजिक कार्यकर्त्या भारती आमटे, माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक मधू जोशी, सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, संदीप वाघेरे, पै. विजय गावडे यांच्यासह प्रशासनातील विविध अधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली; तसेच श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, हेमा दिवाकर, माधव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘नाद अनाहत’ या सांगीतिक मैफलीच्या पूर्वार्धात ‘रुणुझुणु रे भ्रमरा…’ , ‘देव देव्हार्यात नाही…’ , ‘निजरूप दाखवा हो…’ , ‘मी राधिका मी प्रेमिका…’ , ‘जो जो भजनी रंगला…’ , ‘विकत घेतला श्याम…’ अशा एकल अन् युगुलस्वरातील गीतांनी सुयश खटावकर आणि श्रेयसी आपटे यांनी श्रोत्यांना सुश्राव्य गीतांची मेजवानी देत असतानाच स्पृहा खटावकर या बालगायिकेने ‘ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर…’ हे भक्तिगीत सहज सुंदरपणे सादर करून श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळवली. ‘दत्त दर्शनाला जायाचं…’ , ‘राम का गुणगान करीये…’ , ‘बाजे मुरलियाँ…’ , ‘एक राधा एक मीरा…’ आणि स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त ‘पहा आनंद किती हा झाला…’ अशा सुरेल भक्तिगीतांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले.
०१ एप्रिल १९५५ रोजी सादर झालेल्या गीतरामायणाचे गारुड अजूनही रसिकमनावर आहे, याचा प्रत्यय मैफलीच्या उत्तरार्धात सादर झालेल्या निवडक गीतरामायणातील गीतांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून आला. बालगायिका स्पृहाने गायलेल्या ‘सावळा गं रामचंद्र…’ या गीताला वन्स मोअरसह रसिकांनी रोख रकमेच्या बक्षिसांनी दाद दिली. सायली भिडे (हार्मोनियम), नीरज कुलकर्णी (बासरी), वैभव केसकर (तबला), भारत ढोरे (की बोर्ड), नरेंद्र काळे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. ऋचा थत्ते यांनी निवेदन केले.
प्रकटदिन उत्सवात पहाटे ४:३० वाजता श्रींचा केशर दुधाने अभिषेक आणि पूजा, स्वामी गायंत्री जप, श्रींचा सामूहिक रुद्राभिषेक, महानैवेद्य, माध्यान्ह आणि सायंकालीन आरती, भजनसेवा इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. सकाळी ९:३० वाजता ह. भ. प. कबीरमहाराज अत्तार यांनी सुश्राव्य कीर्तनातून छत्रपती संभाजीमहाराज यांचा देदीप्यमान इतिहास कथन केला. ह. भ. प. सुखदेवमहाराज बुचडे आणि सहकारी यांनी साथसंगत केली. दुपारी १२:३० ते ३ या कालावधीत सुमारे पंधरा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सत्संग मंडळ सदस्य कैलास भैरट यांनी आभार मानले.