- माहितीपटात ‘सितारमेकर ऑफ मिरज’ची बाजी; जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचालनालय, परभन्ना फाउंडेशनतर्फे आयोजन
पुणे: जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि परभन्ना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘मायेचं पांघरूण’ या लघुपटाने, तर ‘सितार मेकर ऑफ मिरज’ या माहितीपटाने बाजी मारली. लघुपट, माहितीपट, व्ही-लॉग अशा तीन प्रकारात हा महोत्सव झाला. पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पर्यटनतज्ज्ञ डॉ. विश्वास केळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन विशेष ठरलेल्या ‘मायेचं पांघरूण’ला १० हजारांचे रोख पारितोषिक व इतर सर्व विजेत्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात हा महोत्सव झाला. ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मीडिया व मास कम्युनिकेशन विभागप्रमख प्रा. डॉ. माधवी रेड्डी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. प्रसंगी ज्युरी सिमरन जेठवानी, संयोजक व परभन्ना फाउंडेशनचे संस्थापक गणेश चप्पलवार, पर्यटन संचालनालयाचे आनंद जोगदंड, के. अभिजित, सल्लागार जीवराज चोले आदी उपस्थित होते.
माधव अभ्यंकर म्हणाले, “पर्यटनाच्या संकल्पनेवर लघुपट महोत्सव होणे ही आश्वासक गोष्ट आहे. हा महोत्सव अधिक व्यापक झाला पाहिजे. प्रवासामुळे खूप माणसे जोडली जातात. प्रत्येक माणसाशी संवाद साधावा. त्यातून परस्परांच्या ज्ञानात भर पडते. प्रवास, पर्यटन आपले जगणे समृद्ध होण्यास उपयुक्त ठरते. आनंदाने आयुष्य जगण्याची प्रेरणा त्यातूनच मिळते.”
प्रा. डॉ. माधवी रेड्डी म्हणाल्या, “पर्यटन हे क्षेत्र खूप आर्थिक उलाढालीचे क्षेत्र आहे. त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेत नक्कीच होत असतो. सरकारने पर्यटन हा विषय अधिक गांभीर्याने घ्यावा. पर्यटन आणि चित्रपट सृष्टीची सांगड घातली, तर आर्थिक प्रगतीला आणखी प्रोत्साहन मिळेल.” मेघराज राजेभोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करत हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात गणेश चप्पलवार म्हणाले की, भारतात पर्यटनासाठी खूप समृद्ध व अनुकूल परिस्थिती आहे. इथले निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणे नेत्रदीपक आहेत. मात्र, त्याचा पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने म्हणावा तितका विकास झालेला नाही. याबाबत जनजागृती वाढावी, तसेच लघुपटांच्या माध्यमातून अज्ञात पर्यटन स्थळे समोर यावीत, या उद्देशाने हा महोत्सव आयोजिला जात आहे.
नेहमीच्याच जागा पण वेगळ्या पद्धतीने दाखवणे ही कला आहे. सर्व लघुपट खूप सुंदर होते, असे निरीक्षण डॉ. सिमरन जेठवानी यांनी नोंदवले. महोत्सवात प्रारंभी नृत्याविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. असीम त्रिभुवन यांनी आभार मानले. सारंग मोकाटे, महेश काळे यांनी महोत्सवाच्या आयोजनात परिश्रम घेतले.