पुणे : अण्णांच्या नाटकावर प्रेम नाही, लोभ नाही असे नाही. परंतु त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये आम्हीच त्यांची जुनी नाटकं पुन्हा सादर करून त्यांना खरी आदरांजली वाहता आली असती का? वर्षानुवर्ष तीच तीच नाटकं करून केवळ रंगभूमी पुनर्जीवित करत राहण्याचा संगीत रंगभूमीने वसा घेतला आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत ‘संगीत रंगभूमी पुनर्जीवित करण्यासाठी नवीन संगीत नाटकं रंगभूमीवर येणे गरजेचे आहे. अन् हीच नाटककार विद्याधर गोखले यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल’, असे मत विद्याधर गोखले यांचे चिरंजीव आणि अभिनेते विजय गोखले यांनी व्यक्त केले.
बालगंधर्व रंगमंदिरांच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त तिसऱ्या दिवशी दिग्गज नाटककार विद्याधर गोखले यांच्या शताब्दी निमित्त ‘स्मरण, गप्पा आणि गाणी’ असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती भोगले, अभिनेते विजय गोखले आणि ज्ञानेश पेंढारकर सहभागी झाले होते. अपेक्षेप्रमाणे आठवणी, किस्से आणि नाट्य संगीतांनी सजलेलेल्या या चर्चासत्राचा रसिकांनी मनमुराद आनंद घेतला.
यावेळी विजय गोखले म्हणाले, अण्णांनी (विद्याधर गोखले) लिहिलेल्या संगीत नाटकातील प्रत्येक नाटकाला एक शाश्वत मूल्य होते. शब्दांची योग्य मांडणी मराठी, उर्दू भाषेची सांगड घालण्याचे अनोखे कसब त्यांच्याकडे होते. त्यामुळेच त्यांनी नाट्य संगीतातून मांडलेली जीवन मूल्ये आजही आपल्याला प्रत्येक क्षेत्रात लागू होताना दिसतात. त्यांच्या शताब्दी निमित्त अनेकांनी त्यांचीच जुनी नाटकं पुन्हा सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संगीत रंगभूमी पुनर्जीवित करण्यासाठी नवीन संगीत नाटकं रंगभूमीवर येणे गराजचे आहे. अन् हीच नाटककार विद्याधर गोखले यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल. यासाठी मी एक नवेकोरे संगीत नाटक तयार केले होते. यासाठी नवीन कलाकार, नवीन वाद्य कलाकार, नवीन संगीत दिग्दर्शक तयार केले आणि ते नाटक रंगमंचावर सादर केले. माझ्याकडून ही अण्णांना दिलेली खरी आदरांजली आहे.
दीप्ती भोगले म्हणाल्या,अण्णांना संगीतात गती नव्हती पण त्यांना संगीताची फार आवड असायची. त्यामुळे ते अनेकांची गाणी, संगीत नाटकं पाहायला जात, त्यांच्या नकळत बारकाईने त्यांचे निरीक्षण करत ते सारं समजून घेत असतं. इतकेच नव्हे तर संगीत नाटकाच्या कालावधीचा हिशोब देखील आम्हाला ते समजून सांगायचे. गद्यातलं गाणं ज्याला समाजत त्याला संगीत नाटक समजतं, असे ते म्हणायचे. त्यांनी आम्हाला गद्य आणि पद्यातील पुसटशी रेषा कशी वाचायची हे शिकवलं.
ज्ञानेश पेंढारकर म्हणाले, अण्णांनी अनेक संगीत नाटकं केली. त्यातील अनेकांना मी वाद्यावर साथसंगत केली आहे. अण्णांमुळे मी घडलो. माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला. माझे वडील (भालचंद्र पेंढारकर) आणि अण्णा यांच्यात मतभेद असून देखील त्यांची घट्ट मैत्री होती. कारण त्यांचे कलेवर प्रेम होते. यावेळी त्यांनी दिल्ली येथे रंगलेल्या ‘पंडित राज’ या संगीत नाटकाला तात्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी हजेरी लावल्याचा किस्सा सांगितला.
दरम्यान, आज सकाळी अंजली राऊत (नागपूर) यांचे भरतनाट्यम नृत्य सलोनी लोखंडे व श्रावणी लोखंडे या बालकलाकारांनी भरतनाट्यम व कथक नृत्य फ्युजन सादर केले. तसेच पुणे शहरातील कलाकारांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा रंगारंग कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री शिवानी सोनार, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,अलविरा मोशन एंटरटेनमेंट च्या दीपाली कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.