24.1 C
New Delhi
Friday, May 1, 2026
Homeमनोरंजनयशवंतरावांच्या दूरदृष्टीने मराठी नाटकांना करमणूक कर नाही!

यशवंतरावांच्या दूरदृष्टीने मराठी नाटकांना करमणूक कर नाही!

यशवंतराव चव्हाण कला साहित्य पुरस्कार सोहळा साजरा

  • प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळाच्या वतीने सलग ४० वर्षे कविसंमेलन व पुरस्काराचे आयोजन

पुणे: “ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत मराठी नाटकांवर करमणूक कर आकारला जाणार नाही, असा निर्णय घेतला होता. त्यांच्या या दूरदर्शी निर्णयाचे फायदे आजतागायत मराठी नाट्यसृष्टीला मिळत आहेत. कलासक्त यशवंतरावांचे हे द्रष्टेपण लक्षणीय होते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते सतीश आळेकर यांनी केले. सलग ४० वर्षे कविसंमेलन घेण्याचा वारसा ढेरे कुटुंबाने जपला आहे, हे दिलासादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. महेश कोठारे यांनी लोकप्रिय चित्रपट दिले. अनेक कलाकारांना स्टार करण्यात योगदान दिले. मराठी चित्रपटात नवे तांत्रिक व अद्भुताचे गारूड त्यांनी प्रथम निर्माण केले. त्यांचे सुपुत्र आदिनाथसोबत काम करण्याचा अनुभव घेतल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४० वे कवी संमेलन व यशवंतराव चव्हाण कला साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या समारंभात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांना ‘यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्कार’, तर रानमाणूस प्रसाद गावडे यांना ‘अजितदादा सामाजिक कार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. या दोन पुरस्कारांसह ‘यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार’ बुलढाणा येथील प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी (काव्यसंग्रह-विस्मरणाच्या आरण्यात), चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर (दंडकारूण्य) व नाशिक येथील प्रतिभा पवार-खैरनार (कवितासंग्रह – वंशावळीच्या प्राचीन सरीतून) यांना प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रोख ११,००१ व सन्मानचिन्ह असे होते.

टिळक स्मारक मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्यावेळी ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, नीलिमा कोठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, संयोजक व प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टचे विजय ढेरे, संजय ढेरे, ट्रस्टचे गौरव फुटाणे, मित्र मंडळाचे सचिन जाधव, कुणाल जाधव, नगरसेवक व माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.

सतीश आळेकर यांनी यशवंतराव चव्हाण तसेच प्रकाश ढेरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या लेखन कारकिर्दीच्या सुरवातीला यशवंतराव आणि ढेरे, या दोघांशीही माझा संबंध आला होता. मराठी नाटकांचे दिल्लीमध्ये प्रयोग असले, की मराठी कलावंतांच्या पाहुणचारासाठी दिल्लीतील मराठी नेते आवर्जून पुढाकार घेत. त्यानिमित्ताने यशवंतरावांशी भेट घडली. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मराठी रंगभूमीसाठी करमणूक कर माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला, त्याचा फायदा मराठी नाट्यसृष्टी आजही घेत आहे. यशवंतराव अतिशय उत्तम वाचक होते, रसिक होते, त्याची अनेकदा प्रचिती आल्याचे आळेकर म्हणाले.

महेश कोठारे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा पुरस्कार, तोही ढेरे कुटुंबीय आणि जिथून माझी कारकीर्द सुरू झाली, त्या गंगा लाॅज वास्तूशी निगडीत ट्रस्टकडून मिळणे, हा मी मोठा सन्मान समजतो. १९७५ मध्ये गंगा लाॅजच्या खालच्या मजल्यापासूनच माझी कारकीर्द सुरू झाली होती. मला गुरुसमान असणाऱ्या आण्णासाहेब देऊळगावकरांचे कार्यालय गंगा लाॅजच्या खालीच होते, असे सांगून कोठारे यांनी चित्रपटीय कारकिर्दीची माहिती दिली.

प्रसाद गावडे म्हणाले, कोकणातील नंदनवन असणाऱ्या गावांत राहून तिथेच काम करतो. निसर्गाशी, पर्यावरणाशी जुळवून घेत जगणारी माणसे आजही कोकणात आहेत. पर्यावरणस्नेही जगणे आणि शाश्वतता त्यांनी अबाधित राखली आहे. त्यांचे समृद्ध जगणे आजच्या तथाकथित विकासप्रक्रियेचे फलित नाही, हे आवर्जून सांगायला हवे. अजितदादा पवार यांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्यासाठी आनंददायी आहे. कारण जल, जमिनीविषयी आस्था बाळगणारे ते नेते होते. प्रास्ताविकात ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे म्हणाले, कवींनी सर्वसामान्यांचे जगणे, समस्या, दुःख यांचे प्रतिनिधित्व करावे. त्यांचे प्रश्नही कवितेतून मांडावेत, यासाठीच या उपक्रमाचे स्वरूप कवीसंमेलन, असे ठेवले आहे. गेली ४० वर्षे ते जपले आहे. तशीच श्रोत्यांनीही रसिकता जपली आहे. अंजली कुलकर्णी यांनी साहित्य पुरस्कारप्राप्त कवींचा परिचय करून दिला. राजेश्वरी थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. विजय ढेरे यांनी सर्वांचे आभार मानले.

काव्यमैफलीने रसिकांना मोहिनी
‘रिकामं सिलेंडर म्हणालं, नको तेव्हा पेटत होतो, आता सारं संपलं आहे, तैलबुद्धी लोकांचं, आखातात जुंपलं आहे’ या रामदास फुटाणे यांच्या सद्यस्थितीवरील काव्याने मैफलीची सुरुवात झाली. स्त्री शोषणावरील भाष्य करणारी मधुरा उमरीकर यांची ‘काल चार कविता नदीवर आल्या होत्या काळीज धुवायला’, स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्या समाजाला फटकारणारी गुंजन पाटील यांची ‘मी लक्ष्मण रेष ओलांडून आली, मी अजिबात रावणाला घाबरत नाही’, आदिवासी भागाचे वास्तव मांडणारी अविनाश पोईनकर यांची ‘आमचे स्वातंत्र्य आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही’, धार्मिक परिस्थितीवर भाष्य करणारी यामिनी दळवी यांची ‘धर्माच्या दावणीला’, दुष्काळाचे वास्तव सांगणारी प्रशांत मोरे यांची ‘कोरड्या हौदा पाशी माझा ज्योतिबा गं उभा’, शेतीची कहाणी सांगणारी कल्पना दुधाळ यांची ‘काहीच पिकलं नाही तेव्हा अनुभव पिकला’, परिस्थितीची जाणीव नसलेल्या मुलाचे जगणे सांगणारी भारत दौंडकर यांची ‘मुलगा पुस्तक वाचत होता’ या आणि अशा आशयघन काव्यरचनांनी पुणेकर रसिकांना मोहिनी घातली. प्रसंगी खळखळून हसवले, तर काही शब्दांनी डोळ्यात पाणीही आणले. अशोक नायगावकर यांनी ‘उजवा डावा’ या कवितेतून समाजकारण आणि राजकारण यातली विषन्नता विनोदी शैलीतून सादर केली. महेश केळुस्कर व शशिकांत तिरोडकर यांनी मालवणीत रचना सादर केली. अनिल दीक्षित यांनी पुणेरी शैलीत पुण्याची महती आपल्या काव्यातून मांडली. ‘एक बातमी दडपण्यासाठी, नवी बातमी घडवत असतात, एफस्टीनचा ब्लॅक बॉक्स, आयुष्यभर दडवत असतात’ या वात्रटिकेतून सध्या चर्चेत असलेल्या मुद्द्यावर रामदास फुटाणे यांनी मिश्किल भाष्य केले. ‘तुझ्या आतल्या अस्वस्थतेचा, डोंगर पोखरू नकोस बये’ या कवितेतून प्रतिभा खैरनार यांनी स्त्रीचे जगणे उलगडले.

या कवी संमेलनात अशोक नायगावकर (मुंबई), महेश केळुसकर (फोंडा), वैशाली पतंगे (कुंभारगाव), प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी (बुलढाणा), अविनाश पोइनकर (चंद्रपूर), यामिनी दळवी (मुंबई), प्रतिभा खैरनार (नाशिक), प्रशांत मोरे (कल्याण), कल्पना दुधाळ (बोरी भडक), मधुरा उमरीकर (परभणी), अविनाश कोठावडे (संभाजीनगर), अरुण पवार (परळी वैजनाथ), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी), अंजली कुलकर्णी (पुणे), अनिल दीक्षित (पिंपरी चिंचवड), शशिकांत तिरोडकर (कोकण), गुंजन पाटील (सोयगाव) हे राज्यभरातील नामवंत कवी सहभागी झाले होते. गंगा लॉज मित्र मंडळाचे सचिन जाधव, शिकागो मराठी मंडळाचे अध्यक्ष माधव गोगावले यांनी कविता सादर केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
24.1 ° C
24.1 °
24.1 °
57 %
2.6kmh
20 %
Fri
39 °
Sat
42 °
Sun
42 °
Mon
41 °
Tue
38 °

Most Popular

Recent Comments