पिंपरी, -:अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्रचार्या शीतल मोरे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, बटू शिंदे, उदय फडतरे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. दरम्यान, बालकांनी फळे, फुले, विविध व्यावसायिक व पर्यावरणातील विविध घटकांचे संवर्धन या विषयांवर वेशभूषा केल्या होत्या. त्यावर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या. शिक्षिका नीलम मेमाणे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
संस्थेचे अध्यक्षा आरती राव मॅडम म्हणाल्या, लहान मुले हेच देशाचे भविष्य आहेत. आजचा बालक उद्याचा नागरिक आहे. त्यामुळे ती नेहमी आनंदी, उत्साही आणि सुरक्षित असायला हवीत. उद्याचा भारत यांच्यावरच अवलंबून असणार आहे. खेळण्या- बागडण्याचा मनसोक्त आनंद घ्या. चांगलं वाचन करा. आता अभ्यास केला, तर भविष्यात आनंदी, सुखी जीवन जगू शकाल, असा सल्लाही त्यांनी छोट्या मुलांना दिला.
प्रणव राव यांनी सांगितले, बालदिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांचा विकास, शिक्षण आणि हक्क याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे, हा आहे. ही छोटी छोटी मुलं भारताचे उज्ज्वल भविष्य आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, की ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.’ लहानपणाचे दिवस पुन्हा येत नाहीत.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या, देशाच्या विकासात भर घालण्याची संधी आपल्या शिक्षकांना या मुलांच्या माध्यमातून मिळालेली आहे, त्यामुळे आपण उत्तम नागरिक घडवूया.
