पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपुरमध्ये येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची आठ हजार किट पुनीत बालन ग्रुपकडून देण्यात येणार आहेत. यामध्ये ६ हजार पुरुष पोलिसांचा तर २ हजार महिला पोलिसांचा समावेश आहे. दरवर्षी हे किट देण्यात येत असून त्यात दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने पोलिसांची गैरसोय टळणार आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्त दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संताच्या पालखी समवेत लाखो वारकरी पंढरपुरमध्ये येत असतात. यावर्षी येत्या १७ जुलैला आषाढी वारी सोहळा आहे. त्यामुळे लाखो वारकर्यांसह दर्शनासाठी येणार्या महत्वाच्या आणि अति महत्वाच्या व्यक्तींसाठी सहा हजार पुरुष आणि दोन हजार महिला असा जवळपास आठ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी येणार आहेत. आषाढी वारी सोहळ्याच्या आठ दिवस हे कर्मचारी पंढरपुरमध्ये असणार आहे. त्यामुळे या सर्वांसाठी आवश्यक वस्तूंचे किट बॅगेसह उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी पंढरपुरचे उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार बालन यांनी तत्काळ हे किट उपलब्ध करून देण्याचे जाहिर केले आहे. गतवर्षीही पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून हे किट देण्यात आले होते.
- काय असणार आहे किटमध्ये
पोलिसांनी मागणी केल्याप्रमाणे या किट बॅगमध्ये दोन ग्लुकोज पावडर, दहा मास्क, बिस्किट पाकिट, कोलगेट, ब्रश, चिक्की, हेअर ऑईल, शेविंग ब्लेड, साबण आणि महिलांसाठी सॅनिटरी पॅड या वस्तूंचा समावेश असणार आहे.
……
कोट
“पोलिस बांधव उन, वारा पाऊस यांची तमा न करता दर्शनासाठी येणार्या वारकर्यांची सुरक्षा व्यवस्था करतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार दैनंदिन वस्तूंचे किट देण्यात येणार आहे. या माध्यमातून वारकर्यांच्या सेवेचा खारीचा वाटा उचलण्याचे पुण्य आमच्या टिमला मिळेल.”
पुनीत बालन, युवा उद्योजक