- पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी क्षेत्र आणि सोसायटी परिसरात दारुच्या दुकानांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर आमदार महेश लांडगे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला. यावेळी त्यांनी दारु दुकानांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर राज्यभरात चर्चेचा आणि सकारात्मक प्रतिसादाचा सूर उमठला, ज्यामुळे कारवाईला गती मिळाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्यावर विधानसभा सभागृहात सकारात्मक उत्तर दिले होते, आणि त्यानंतर भोसरी, चिखली, मोशी आणि पिंपरी-चिंचवड भागातील नियमबाह्यपणे दारु विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात आली. आमदार लांडगे यांनी चिखली-मोशी-चऱ्होली- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनसह संबंधित विभागांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासानंतर चिखली आणि मोशी क्षेत्रातील चार दारु दुकानांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला. त्यानुसार, उषा चौधरी देशी दारु दुकान, एम.डी.के. बिअर शॉपी, गोल्डन बिअर शॉपी आणि लकी बिअर शॉपी या दुकानदारांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
दारु विक्रेत्यांमध्ये खळबळ…
दारु विक्रेत्यांच्या मनमानी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील मद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. रहिवाशी क्षेत्रात असलेल्या या दुकानदारांकडून होणाऱ्या त्रासाविरोधात प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. या कारवाईला नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला असून, यामुळे इतर विक्रेत्यांना देखील एक चेतावणी मिळाली आहे की, नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल.
“सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासावर आम्ही अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, या मुद्द्यावर सरकारने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठपुरावा केला. त्याचा परिणाम म्हणून चार दुकानांचा परवाना कायमस्वरुपी रद्द झाला. आम्ही राज्य सरकारकडे अशीच कारवाई महाराष्ट्रभर करण्याची मागणी केली आहे.
– महेश लांडगे (आमदार )