पुणे : नाट्य किंवा चित्रपट क्षेत्रात अगदी लहानांपासून मोठयांपर्यंत प्रत्येकाकडून काहीतरी घेण्यासारखे असते. अजूनही मी विद्यार्थी आहे. मी करतोय हे लोकांना आवडत आहे. तरी देखील मी पूर्णत्वाला गेलो, असे मी म्हणू शकत नाही. यापुढेही मी बरेच काहीतरी करू शकतो, असे मला वाटते. राजदत्त यांच्याकडून आम्ही नकळत शिकून गेलो. प्रत्येक माणसात वेगळा गुण असतो, त्या न्यायाने प्रेक्षक देखील कलाकारांचे गुरु असतात, असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले.बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गुरुमहात्म्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सिने दिग्दर्शक राजदत्त, विद्यावाचस्पती डॉ.शंकर अभ्यंकर, ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे तसेच दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार अॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै आणि ज्येष्ठ उद्योजक डॉ. कैलास काटकर यांना यंदाचा गुरुमहात्म्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवेदिता सराफ यादेखील यावेळी उपस्थित होत्या. श्री दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, महावस्त्र व रुपये २५,०००/- असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
राजदत्त म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात दु;ख असतात, राहतात. मात्र, त्याला तोंड देत, त्यावर मात करीत जीवन जगता आले पाहिजे. नैराश्य आणि दु;खाने माणूस अस्वस्थ होऊन जातो. तरी देखील आनंदात जगण्यासाठी माणसाला कष्ट करावे लागतात. आजच्या भोगवादी जीवनात चांगले विचार समाजात रुजविण्याचे कार्य दत्तमंदिर ट्रस्टचे कार्य सुरु आहे.
शंकर अभ्यंकर म्हणाले, कला, अध्यात्म व विज्ञान या क्षेत्रातील दिग्गज आज दत्त मंदिराच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. विज्ञानाने प्रगती केली असली, तरी देखील मानवी जीवनाला दिशा देईल, असे वाटत नाही. विज्ञान हे तटस्थ आहे, मानवाने त्याचा उपयोग कसा करावा, याकरिता अध्यात्माची आवश्यकता आहे.
ते पुढे म्हणाले, ज्ञान आणि विज्ञानाने हातात हात घालून पुढे जायला हवे. मानवी जीवनाची उभारणी त्यावरच व्हायला हवी. विज्ञानाच्या प्रगतीत मानवाची शांती हरवून गेली आहे का? मनुष्य चंगळवादाच्या मागे लागला आहे का ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. समाजाला जोडण्याचे काम दत्त संस्थान करीत आहे, त्याबद्दल त्यांनी संस्थानचे अभिनंदन केले.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, डिजिटल इंडिया आज आपण बघतोय. जगातील क्रमांक १ ची मोबाईल बाजारपेठ ही भारत आहे. तळागाळात डिजिटल तंत्रज्ञान पोहोचले आहे. मात्र, यामध्ये सुरक्षा ही देखील महत्वाची आहे. आपण ती उपकरणे चांगल्या गोष्टींसाठी वापरली पाहिजेत. त्यासाठी आज सायबर संस्कार हे देखील होणे गरजेचे आहे.