36.5 C
New Delhi
Thursday, June 25, 2026
Homeमहाराष्ट्रदिव्यांगांसाठी खरेदी केलेली ई-वाहने त्वरित वाटप करा!

दिव्यांगांसाठी खरेदी केलेली ई-वाहने त्वरित वाटप करा!

अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार ; मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांचा इशारा

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी खरेदी केलेली तीन चाकी फिरती ई-वाहने गेल्या दोन महिन्यांपासून दिव्यांग भवनाच्या पार्किंगमध्ये धूळ खात पडून आहेत, ही बाब अत्यंत संतापजनक व धक्कादायक आहे. डिसेंबर महिन्यापासून वाहन वाटप रखडले असून एकाही लाभार्थ्याला वाहन देण्यात आलेले नाही. यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड असंतोष व संताप निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे दिव्यांगांच्या हक्कांवर गदा येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई-वाहने वाहने दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात यावी, अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.

               याबाबत महापालिका आयुक्त तसेच महापौर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेने लाखो रुपयांचा खर्च करून खरेदी केलेली वाहने वापराविना पडून राहणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे व असंवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण आहे. दिव्यांग नागरिकांना रोजगार, व्यवसाय, शिक्षण व दैनंदिन प्रवास सुलभ व्हावा, या उद्देशाने ही वाहने खरेदी करण्यात आली होती. ‘पर्पल जल्लोष’ या कार्यक्रमात वाहन वाटपाची मोठ्या थाटात घोषणा करण्यात आली, मात्र आरटीओच्या तथाकथित तांत्रिक कारणांचा बागुलबुवा करून वाटप अचानक थांबविण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने पूर्णपणे हात वर केले असून आजतागायत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. सध्या सदरील ई-वाहने दिव्यांग भवन परिसरात उभी असून वाहनांवर धूळ साचलेली आहे, काही वाहनांचे टायर पंक्चर झाल्याचेही निदर्शनास आले आहे. ही केवळ दुर्लक्षाची नव्हे तर दिव्यांग बांधवांच्या हक्कांवर चाललेली उघड अन्यायाची बाब आहे. तरी महापालिकेने आरटीओ विभागाशी तातडीने समन्वय साधून सर्व तांत्रिक अडचणी तत्काळ दूर कराव्यात व रखडलेले ई-वाहन वाटप त्वरित सुरू करावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईलने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी. याप्रकरणी कोणतीही टाळाटाळ किंवा वेळकाढूपणा सहन केला जाणार नाही. आपण सदर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन ठोस कार्यवाही करावी, ही विनंतीवजा अपेक्षा आहे. असे सचिन चिखले यांनी म्हटले आहे.

          दरम्यान, मनसेच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी मनसे शहर सचिव रुपेश पटेकर, मनसे उपशहराध्यक्ष बाळा दानवले, मनसे विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, प्रबुद्ध कांबळे व प्रविण कांबळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
36.5 ° C
36.5 °
36.5 °
30 %
3.7kmh
13 %
Wed
37 °
Thu
43 °
Fri
43 °
Sat
44 °
Sun
43 °

Most Popular

Recent Comments