- आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेला प्रशासनाचे पाठबळ
पिंपरी –
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून कै. आण्णासाहेब मगर स्टेडिअम आधुनिकपद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी शहरातील पहिला पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लब उभारण्यात येणार आहे. प्रशासनाने या प्रकल्पाचा ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ तयार केला आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराच्या क्रीडा क्षेत्राला नवा आयाम मिळणार आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून कै. आण्णासाहेब मगर स्टेडिअमचे पुनरुज्जीवन करण्यात करण्यात येत आहे. मात्र, सदर स्टेडिअम दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात येईल, असा ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्याचा प्रयत्न राजकीय हेतुने केला जातो आहे. परंतु, यामध्ये तथ्य नाही.
मगर स्टेडिअमचा विकास २६ एकर जागेत होणार असून, या ठिकाणी पुण्यातील डेक्कन जीमखानाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लबही उभारण्यात येत आहे. शहराच्या क्रीडा व मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आण्णासाहेब मगर स्टेडिअम संचलित केले जाणार आहे. याठिकाणी शॉपिंग मॉल, हॉटेल्स, क्लब हाउस, ॲकॅडमी निर्माण होतील. त्यामुळे क्रीडा, संस्कृती, मनोरंजन आणि आकर्षक वास्तू उभारण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, या स्टेडिअमवर बॅडमिंटन कोर्ट्स, स्वॅश कोर्ट्स, रेस्टॉरंट, जिमनॅशिअम, हेल्थ क्लब, बॅन्क्वेट फॅसिलिटी, कार्ड रुम, मिटिंग रुम, बिझनेस सेंटर, रेसिडेन्सिअल रुम, टेनिस, स्विमिंग पूल, चिल्ड्रन एरिया, जॉगिंग ट्रॅक अशा सोयी-सुविधा निर्माण होणार आहेत. त्यामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रातील हा स्टेडिअम केंद्रबिंदू ठरणार आहे.
शहराची वाटचाल स्पोर्ट्सिटीच्या दिशेने…
पिंपरी-चिंचवड शहराला स्पोर्ट्स सिटी बनवण्याचा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. त्या संकल्पनेतूनच भोसरीतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी व कुस्ती संकुल विकसित झाले. यासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑर्चरी, बॉक्सिंग रिंग, रायफल शुटिंग, स्केटिंग अशी क्रीडा संकूल उभारली आहेत. आता आण्णासाहेब मगर स्टेडिअम व पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लब होणार असल्यामुळे शहराच्या सौंदर्यात आणि लौकीकातही भर पडणार आहे.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात दुर्लक्ष…
मगर स्टेडिअमच्या नूतनीकरणाचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात २०१९ मध्ये घेण्यात आला. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या कामाला विरोध केला होता. दरम्यान, राज्यात सत्ता परिवर्तन झाले. महाविकास आघाडीची सत्ता आली. पण, मविआच्या अडीच वर्षांच्या काळात स्टेडिअमबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. किंबहुना, नूतनीकरणाचे काम ‘जैसे थे’ होते. आता महायुतीच्या सत्ताकाळात स्टेडिअमसह पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लबच्या कामासाठी कार्यवाही केली जात आहे. पण, महाविकास आघाडीतील इच्छुकांकडून स्टेडिअमच्या कामाचे राजकारण केले जात आहे. तसेच, चुकीच्या माहितीच्या आधारे पिंपरी-चिंचवडकरांमध्ये ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्यात येत आहे.