पुणे- : पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विस्तारित मार्गामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत २० हजारांची वाढ झाली आहे. यामुळे मेट्रोची एकूण दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी ८० हजारांवर पोहोचली आहे. या मार्गावरील येरवडा स्थानक अद्याप सुरू झाले नसून ते सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत आणखी वाढ होणार आहे.
रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे ६ मार्चला केले. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या आधी सुमारे ६० हजार होती. रामवाडीपर्यंत विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या ८० हजारांवर पोहोचली आहे. विस्तारित मार्ग सुरू होण्याआधी मेट्रोचे दैनंदिन उत्पन्न सुमारे १० लाख रुपये होते. आता मेट्रोचे दैनंदिन उत्पन्न १२ लाख ५० हजार रुपयांवर पोहोचले आहे.