कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा पहिला टप्पा मी पूर्ण केला. त्यातील प्रतिसाद पाहता, ही निवडणूक आम्हाला मागील पोटनिवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन देईल, असा विश्वास आमच्यात निर्माण झाला आहे, असा आत्मविश्वास महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट, आम आदमी पक्ष आणि मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ते म्हणाले की, काल पुण्यात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा कोणताही इम्पॅक्ट मतदारांवर दिसून आला नाही. आज पुणे शहराला जे भरभराटीचे स्वरूप आले आहे त्यातील काँग्रेसचे योगदान सगळे जाणून आहेत. त्यामुळे नुसती भाषणबाजी आणि प्रत्यक्ष काम हे मतदार मनाशी ताडून पाहतात. त्यात पंतप्रधान मोदी आणि भाजपचा बोलघेवडेपणा दिसून येतो आणि त्याचीच परिणीती या मतदानात होणार आहे, असे ते म्हणाले.
धंगेकर पुढे म्हणाले की, पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीए यासह असंख्य संरक्षण संस्था काँग्रेसच्या काळात उभ्या राहिल्या, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायऱॉलॉजी यांसारख्या संशोधन संस्थाही पुण्यात उभ्या राहिल्या, सीडब्ल्यूपीआरएस या जलसंशोधन संस्थेचे विस्तारीकरण पुण्यात काँग्रेसच्या काळात झाले. लष्करी, वैद्यकीय संस्थांसारख्या काँग्रेसने उभारलेल्या संस्थांमुळे पुण्याचे महत्त्व वाढले. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आणि मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत पुण्याच्या वैभवात भर घालणारी एकही नवी संस्था येथे उभी केली नाही. जागृत पुणेकर याची नोंद ठेवून आहेत.
ते म्हणाले की, पुण्यात काँग्रेसने उभारलेल्या राजीव गांधी आयटी पार्कमध्ये आज अडीच लाख लोक नोकरी करतात. पिंपरी-चिंचवडचा परिसर औद्योगिकनगरी म्हणून काँग्रेसच्याच काळात विकसित झाला आणि हजारो पुणेकरांना तेथे रोजगार मिळाला. अशी एकही औद्योगिक वसाहत गेल्या दहा वर्षांत पुणे किंवा परिसरात भाजपाला उभारता आलेली नाही.
त्यांनी सांगितले की, खोटे बोलणे हा भाजप नेत्यांचा स्थायीभाव पुणेकरांच्या नेहमी प्रत्ययाला येतो आहे. कालच पुण्यातील भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांनी पुरात पडलेल्या आंबील ओढ्याच्या भिंतीसाठी २०० कोटी रुपये आणून तो विषय मार्गी लावला, असा धादांत खोटा दावा केला आहे. या २०० कोटींतील दोन रुपयेसुद्धा प्रत्यक्ष कामाच्या उपयोगात आणले गेलेले नाहीत. हा निधी नेमका आहे कोठे? हा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
ते म्हणाले की, पुण्यात काँग्रेसने महापालिकास्तरावरून ज्या संस्था, इमारती, शाळा, उद्याने उभारली, त्यावर आता भाजप नगरसेवकांनी संकल्पना म्हणून आपली नावे टाकली. हा खोटारडेपणा तर पुणेकरांना चांगलाच झोंबलेला आहे
ते म्हणाले की, भाजपच्या काळात पुण्यातील ब्राह्मण समाजाचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण झाले. हा समाज खूप पूर्वीपासून सातत्याने भाजपच्या पाठीशी उभा असतानाही आज पुण्यात एकही ब्राह्मण उमेदवार ते देऊ शकलेले नाहीत, याची खंत पुणेकरांना आहे. ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या कर्तबगार भाजप नेत्याला महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेतून खड्यासारखे दूर केले गेले, याचीही खंत या समाजामध्ये आहे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.
महाराष्ट्राच्या हितासाठी ही निवडणूक अधिक महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी या निवडणुकीचे महत्त्व अधिक आहे, हे पुणेकर जाणून आहेत, असे शेवटी त्यांनी सांगितले.