पुणे- शहरातील वाहतुकीची कोंडीआणि प्रदूषण कमी करण्यासाठी मध्य वस्तीतील अरुंद रस्त्यांवर दहा रुपयांत दिवसभर प्रवासाची सुविधा देणारी पुण्यदशम् बससेवा पुणेकरांच्या पसंतीला उतरली असून, तीन वर्षांत एक कोटीहून अधिक नागरिकांनी प्रवास केला असल्याचा दावा भाजप महायुतीचे कसबा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांनी केला.
रासने यांच्या प्रचारार्थ शनिवार आणि नारायण पेठेत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, राजेश येनपुरे, गायत्री खडके, राजेंद्र काकडे, उदय लेले, सुनील रसाळ, सुनील रासने, महेश सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
रासने म्हणाले, “मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना पुण्यदशम योजनेसाठी 50 मिडी बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ही योजना पुणेकरांसाठी अल्पावधीतच यशस्वी ठरली. शहरातील अरुंद रस्त्यांवर मध्यम आकाराच्या बसेसने प्रवाशांना सुरक्षित आणि सक्षम पर्याय दिला. या बसेसची रंगसंगती व रुट बोर्ड वेगळा असल्याने प्रवाशांना समजण्यास सोपे जाते. नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि वेळेची बचत करणारी ही योजना आहे.”
रासने पुढे म्हणाले, “या योजनेतील बसगाड्या सीएनजीवर चालणाऱ्या असल्याने पर्यावरणपूरक आहेत. पहिल्या टप्प्यात कसबा मतदारसंघातील सर्व मध्यवर्ती पेठा, स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पूलगेट या वर्तुळाकार मार्गावर प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. पुण्यदशमच्या माध्यमातून खासगी वाहनांकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे प्रवाशांना वळविण्याचा प्रयत्न आहे. पुढील काळात आणखी 300 मिडी बसेस घेण्याचे नियोजन आहे.
आगामी काळात पीएमपीएमएलची सेवा प्रवासीस्नेही होण्याच्या दृष्टीने असे अभिनव उपक्रम राबविणार आहोत.”