पुणे- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा भाषेचा गौरव आहे. आता आपले काम सुरू झाले असून भाषा विकास आणि प्रचार यादृष्टीने काम करावे लागेल. मराठी शाळेत दर्जा सुधारणे, पटसंख्या वाढवणे याबाबत काम करावे लागेल. आपली पुढील काळात परीक्षा आहे आगामी काळात आपण प्रयत्न करावे लागणार आहे. पुढील अर्थसंकल्पात भाषा करीता निधी तरतूदसाठी काम करण्यात येईल असे मत केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. यावेळी अभिनेते प्रवीण तरडे यांनी केंद्र शासनाचा अभिनंदन ठराव केला.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या निमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद पुणे यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे,
पुणे विद्यापीठ कुलगुरू सुरेश गोसावी, माजी खासदार प्रदीप रावत, राजीव तांबे, राहुल सोलापूरकर, आनंद माडगूळकर, प्रवीण तरडे, धीरज घाटे, दीपक मानकर, किरण साळी, राजीव बर्वे, सुनील महाजन, राजेश पांडे उपस्थित होते.साहित्य संमेलन माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले की, मराठी भाषेला दर्जा मिळाला आता केंद्र सरकार काय करणार हे सांगण्यात आले. प्रगत भाषेला निधी देण्याची तरतूद करण्यात यावी. राज्य शासन त्याला पाठबळ आगामी काळात देईल. प्रत्येक भाषेचे सेंटर ऑफ एक्सेलंस तयार करून त्यात मनुष्यबळ उपलब्ध करावे. देशात 50 पेक्षा अधिक केद्रिय विद्यापीठ आहे त्याठिकाणी आपल्या भाषेचे अध्यासन केंद्र सुरू करण्यात यावे. अभिजात भाषा यांना कोणताही मतभेद न करता सम प्रमाणात निधी देण्यात यावा तसेच त्याकरीता वेगळे निधी तरतूद करण्यात यावी. अभिजात भाषा दर्जा दिल्याने मराठी भाषा प्राचीन आणि कोणत्या दुसऱ्या भाषेतून आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठी भाषा ज्ञान भाषा झाली पाहिजे. मराठी नाटक, सिनेमा आपण पहिले पाहिजे, मराठी पुस्तके विकत घेऊन वाचावी. आपली भाषा बाबत अस्मिता टोकदार होणार नाही तोपर्यंत ती जिवंत राहून टिकणार नाही.
रामदास फुटाणे म्हणाले , 11 वर्ष रखडलेले काम पूर्ण केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन आहे. जर्मन, फ्रांस आणि चीन या देशात मातृ भाषेत शिक्षण दिले गेल्याने त्यांनी विकास साधला. अभिजात दर्जा टिकवणे हे साहित्यिक, कलाकार यांचे काम आहे. विद्यापीठ मध्ये भाषेचे शिक्षण दिले जाते पण त्याचा वापर प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात झाला पाहिजे.इंग्रजी भाषा आपल्याला टाळता येत नाही पण मराठी भाषा आपल्याला विसरता येणार नाही ती जिवंत ठेवण्याचे काम आगामी काळात करावे लागेल.
पुणे विद्यापीठ कुलगुरू सुरेश गोसावी म्हणाले, मराठी भाषा भवन विद्यापीठ मध्ये राबविण्यात येत आहे. एक हजार पुस्तके मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संशोधन दृष्टीने ते पुढे नेण्यात येईल.
राहुल सोलापूरकर म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी भांडारकर संस्थेने पुढाकार घेतला आणि तीन प्राध्यापक यांनी त्यात सक्रिय भाग घेऊन 126 पानी अहवाल केंद्र सरकारला सन 2013 मध्ये पाठवला होता. आज आपल्याला त्याची पूर्तता झाली आहे. मराठी शाळा सक्षम झाल्या पाहिजे, मराठी बोलण्याचा आग्रह सर्वांनी केला पाहिजे. जो मातृभाषेत विचार व्यक्त करतो तो अधिक प्रगल्भ असतो.
जेष्ठ साहित्यिक आनंद माडगूळकर म्हणाले, इंग्रजी भाषेला विरोध करणे बाजूला ठेवून आपली भाषा विकसित करण्याचे धोरण अवलंबण्यात यावे. मराठी भाषा राज्यातील सर्व शाळेत बंधनकारक करण्यात यावी. त्यात मराठी भाषा संस्कृती समाविष्ट करण्यात यावी. इतरांचा द्वेष न करता आपली भाषा प्रगल्भ करावी.
राजेश पांडे प्रास्ताविक करताना म्हणाले, पुणे शहराचे साहित्य, भाषा यावर मोठे प्रेम असल्याचे पुस्तक मोहत्सव मधून दिसून आले आहे. अनेकजणांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले. अनेक वर्षानंतर स्वप्नं सत्यातले असून आज आनंदाचा क्षण आहे. संवाद पूनेचे सुनील महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.