पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी ‘डीबीटी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य मिळण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षामध्ये थेट लाभ हस्तांतर (डीबीटी)च्या अंतर्गत क्यूआर कोड आधारित पद्धतीने साहित्याचे वाटप केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा थेट लाभ घेण्यासाठी विभागाने नव्या प्रक्रियेचा अवलंब केलेला आहे.
शहरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साहित्य मिळण्यासाठी शहरातील १५ पुरवठादार ठेकेदारांनी बोलीमध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये ‘आरएफपी’च्या निकषानुसार बोलीमध्ये सहभाग घेतलेल्या १३ पुरवठादार ठेकेदारांची निवड करण्यात आली. यामधील एका पुरवठादार ठेकेदाराने माघार घेतली असून दोघांनी राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यय बोर्ड (NABL) मान्यताप्राप्त प्रयोगशाळे(लॅब)मधून शैक्षणिक साहित्य मंजूर केले आहे. त्यामुळे उर्वरित दहा पुरवठादार ठेकेदारांना त्यांच्या वस्तूंचे पुनर्चाचणीसाठी राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यय बोर्ड (NABL) मान्यताप्राप्त लॅबमधून मान्यता मिळविण्यासाठी साहित्य मागविण्यात आले आहे.
पुरवठादार ठेकेदारांची ओळख गोपनीय ठेवून केले जाणार वस्तूंचे मूल्यांकन…
शैक्षणिक साहित्याचे पुन:परीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यय बोर्ड (NABL)मान्यताप्राप्त प्रयोगशाळेची निवड करण्यात आली आहे. वस्तूंचे मूल्यांकन करताना गोपनीयता व नि:पक्षपातीपणा राखण्यासाठी पुरवठादार ठेकेदारांच्या वस्तूंना विशिष्ट कोड देण्यात आले असून ती निनावी ठेवण्यात आली आहेत. यामध्ये ज्या वस्तू निकष पूर्ण करणार आहेत, त्या वस्तूंचा वितरणासाठी विचार केला जाणार आहे. या पद्धतीमुळे वस्तूंचे नि:पक्षपातीपणे मूल्यांकन होऊन उत्कृष्ट दर्जाचे साहित्य विद्यार्थ्यांना मिळण्यामध्ये मदत होणार आहे.
२३ जूनपर्यंत विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त करण्याच्या मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांना सूचना…
गुणवत्ता मूल्यांकनाव्यतिरिक्त, सर्व शाळांतील मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांकडून विद्यार्थ्यांची माहिती २३ जून २०२४ पर्यंत मागविण्यात आली आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर ई-रूपी व्हाउचरच्या वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
सर्व विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’च्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाचे साहित्य पुरविण्यासाठी महापालिका नेहमी प्राधान्य देत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य देण्यासाठी महापालिका आग्रही असून साहित्य गुणवत्ता मूल्यांकनाद्वारे गुणवत्ता तपासली जाणार आहे. त्यासाठी आम्ही विशिष्ट प्रक्रियेद्वारे पुरवठादार ठेकेदारांची नेमणूक करून गुणवत्तेशी तडजोड न करता विद्यार्थ्य्यांना दर्जेदार साहित्य देण्यासाठी आम्ही प्राधान्य देत आहोत.
- प्रदीप जाभंळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’च्या माध्यमातून देण्यात येणारे साहित्य दर्जेदार असावे, यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेतली आहे. यासाठी साहित्याचे मूल्यांकन करूनच ते निवडण्यात येणार आहे. वस्तूंच्या गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रियेनंतरच निवडल्या जाणाऱ्या वस्तू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. मूल्यांकन चाचणी प्रक्रियेमध्ये गोपनीयता व नि:पक्षपातीपणा राखला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार वस्तूंच्या वाटपामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही प्राधान्याने आग्रही भूमिका घेत आहोत.
- विजय थोरात, साहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
अशी होणार वस्तूंची पुनर्चाचणी…
विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य दर्जेदार आहे का? याची तपासणी करण्यात येणार आहे. याचबरोबर साहित्य पुरवठादार ठेकेदारांची ओळख गोपनीय ठेवल्याने वस्तूंच्या निवडीमध्ये नि:पक्षपातीपणा राखला जाणार आहे. सर्व शालेय वस्तू NABL मान्यताप्राप्त लॅबच्या नियमांची पूर्तता करीत आहेत की नाही, याबाबत चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, पाठविण्यात आलेल्या वस्तूंचा दर्जा, त्यांची उत्कृष्टता, विशेषत: तपासण्यात येऊनच त्या निवडल्या जाणार आहेत.
‘या’ वस्तूंचे होणार वाटप…
विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’च्या माध्यमातून शाळेची बॅग, रेनकोट, स्टेनलेस स्टीलची पाण्याची बाटली, शाळेचे शूज, पीटी शूज, मोजे, स्केल, भूमिती बॉक्स, चित्रकलेचे पुस्तक, व्यायाम पुस्तक, व्यावहारिक पुस्तके, नोटबुक, नकाशा पुस्तक आदी वस्तू मिळणार आहेत.