पुणे: “डिजिटल युगामध्ये सायबर सुरक्षेचा प्रश्न अधिक व्यापक होत आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा क्षेत्रातील नवनव्या आव्हानांवर मात करण्यासाठी उपाय शोधायला हवेत. त्यासाठी प्राध्यापकांनी अद्ययावत ज्ञान ग्रहण करीत सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा,” असे मत आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (एआयटी) अध्यक्ष मेजर जनरल केके चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.
दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) वतीने ‘एआयसीटीई अटल’च्या सहकार्याने ‘सायबर सुरक्षा व एथिकल हॅकिंग’वरील प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे (फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम) उद्घाटन मेजर जनरल केके चक्रवर्ती यांच्या हस्ते झाले. सहा दिवस चालणारा हा कार्यक्रम २ ते ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत होत आहे. प्रसंगी ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर अभय भट, सहसंचालक कर्नल एम. के. प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील, संयोजक डॉ. सुनील ढोरे, समन्वयक डॉ. सागर राणे आणि प्रो. सिता यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
ब्रिगेडियर अभय भट यांनी या क्षेत्राचे महत्त्व, सध्याचे नोकरीतील बदलते स्वरूप आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील ‘एआयटी’च्या योगदानाबद्दल आपले विचार मांडले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने सहभागींच्या मनात सायबर सुरक्षेच्या दिशेने काम करण्याची नवी ऊर्जा निर्माण झाली. यामध्ये सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंग क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञांचे सत्रे आयोजित करण्यात आले आहेत. हा कार्यक्रम ज्ञान वाढविणे, नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाला चालना देणे आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सहभागींची तयारी करण्यावर भर देणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. सुनील ढोरे यांनी प्रोग्रामचा आढावा घेतला. कर्नल एम. के. प्रसाद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेत मार्गदर्शन केले. डॉ. सागर राणे आणि प्रो. सिता यादव यांनी ‘एआयसीटीई अटल’कडून अनुदान मिळवण्यात योगदान दिले. डॉ. बी. पी. पाटील यांनी आभार मानले.