पुणे –
समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले युवा उद्योजक पुनीत बालन यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता आणि देखभाल करण्याची जबाबदारी घेतली आहे. इंद्राणी बालन फाउंडेशन आणि राज्य पुरातत्त्व विभाग यांच्यात यासंबंधीचा करार नुकताच झाला.
पुणे जिल्हयातील सिंहगड किल्यावरील छत्रपती राजाराम महाराज समाधी, वढू बुद्रुक येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ, राजगुरुनगर मधील हुतात्मा शिवराम हरी राजगुरुंचे जन्मस्थळ आणि तुळापूर येथील महादेव मंदिर या राज्य संरक्षित स्मारकांचा यामध्ये समावेश आहे. यासर्व ठिकाणी वर्षभर हजारो पर्यटक भेट देत असतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही संख्या अनेक पटीने वाढलेली असते. या स्थळांविषयी देशातील नागरिकांच्या मनात एक आस्थेची आणि स्वाभिमानाची भावना आहे. या ठिकाणांची देखभाल होणे आवश्यक असल्याने या स्मारकाची दैनदिन स्वच्छता आणि देखभाल करण्याची तयारी उद्योजक पुनीत बालन यांनी राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांच्याकडे पत्राद्वारे दर्शविली होती. पुरातत्व विभागाने त्यास तत्काळ परवानगी दिली. त्यानुसार यासर्व स्मारकांच्या ठिकाणी सामाजिक संस्था दायित्व योजनेअंतर्गत इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून सात सुरक्षा रक्षक कर्मचारी नेमण्यात येणार आहे. तसेच या स्मारकाच्या लगतच्या परिसराची दैनदिन स्वच्छता, देखभाल व परीक्षण फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे.
याबाबत बोलताना पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. वाहणे म्हणाले, “‘सामाजिक संस्था दायित्व योजने’अंतर्गत चार संरक्षित स्मारकांचे देखभालीचे दायित्व ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या वतीने शिवप्रेमी तथा युवा उद्योजक पुनीत बालन यांनी स्वीकारले, त्यांचे कौतुक आणि स्वागत आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेली राज्य संरक्षित स्मारकाच्या दैनंदिन देखभालीसाठी लोकसहभाग वाढत आहे, ही खुप स्तुत्य बाब आहे. यामुळे स्मारकांची स्वच्छता राखणे व देखभाल करण्यास मदत होईल. आपला वारसा जपण्यासाठी इतरांनीही पुढाकार घ्यायला हवा.”
———————————
‘‘महाराष्ट्राला महापुरुषांचा मोठा वारसा लाभला आहे. त्यांची स्मारके ही नेहमीच नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असतात. पुणे शहर आणि परिसरात महापुरुषांची अनेक स्मारके आणि धार्मिक स्थळं आहेत. त्यांची व्यवस्थित देखभाल व तिथं स्वच्छता राखणं आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि स्मारकांचे पावित्र जपले जावे या भावनेतून सामाजिक दायित्व योजनेतून त्यांच्या सुरक्षिततेची आणि स्वच्छतेची जबाबदारी स्वेच्छेने स्विकारली आहे.
– पुनीत बालन, युवा उद्योजक.