पुणे : डिजिटल युगात, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात रोजगाराच्या विविध संधींची दालने खुली होत असताना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करण्यासाठी डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘अत्याधुनिक आयटी करिअर्स 2024++’ हे पुस्तक तंत्रस्नेही युवा पिढीला उपयुक्त आणि मार्गदर्शन ठरेल, असा विश्वास खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘अत्याधुनिक आयटी करिअर्स 2024++’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. प्रगत तंत्रज्ञानाची कास धरलेल्या युवकांना करिअरविषयक मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरेल असे हे पुस्तक आहे. डॉ. शिकारपूर लिखित हे 56वे पुस्तक आहे. बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या टाटा TATA HALL हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल krushan kumar goyal , बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. राजेश कुचेकर, फिडेलसॉफ्ट जपानचे संस्थापक व अध्यक्ष सुनील कुलकर्णी नितीन प्रकाशनचे नितीन गोगटे व्यासपीठावर होते.
पुस्तकाविषयी बोलताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, करिअर म्हणजे काय? येथपासून ते डिजिटल संस्कार एक अत्यावश्यक गोष्ट, उद्योजकता @ आयटी, संगणक क्रांतीमुळे बदलणारे रोजगार, क्लाउड कॉम्प्युटिंग, माहिती सुरक्षा, कृत्रिम बुद्धिबत्ता, जनरेटिव्ह एआय, ॲनालिटिक्स, चॅट बॉट एआय, अवकाश क्षेत्रातील संगणक तंत्रज्ञान, सायबर फॉरेन्सिक, यूट्यूबर, मेडिकल अशा विविध क्षेत्रात असलेल्या करिअर संधींविषयी वाटा या पुस्तकाद्वारे शोधता येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात युवा पिढीला करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
खासदार कुलकर्णी पुढे म्हणाल्या, युवा पिढीला डिजिटल युगात करिअरच्या विविध संधींचे अवकाश उपलब्ध आहे त्यांनी योग्य ती संधी शोधून भरारी घ्यावी.
उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी आयुष्यात यश कसे प्राप्त करावे याविषयी विवेचन करून डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात युवा पिढीला हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असे सांगितले.
तंत्रज्ञानाच्या जोडीला भाषेचे उत्तम ज्ञान आत्मसात केल्यास देशातच नव्हे तर विदेशातही करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे सुनील कुलकर्णी म्हणाले.
प्राचार्य डॉ. राजेश कुचेकर म्हणाले, युवकांना भविष्यातील वाटचालीत डॉ. शिकारपूर लिखित पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
सूत्रसंचालन वैशाली कार्लेकर यांनी केले तर स्वागत व आभार प्रदर्शन नितीन गोगटे यांनी केले.
फोटो ओळ : ‘अत्याधुनिक आयटी करिअर्स 2024++’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) नितीन गोगटे, डॉ. दीपक शिकारपूर, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, कृष्णकुमार गोयल, प्राचार्य राजेश कुचेकर, सुनील कुलकर्णी.