पुणे -अंतराळात उपग्रह उडविण्यासाठी जे रॉकेट लाँचर लागते, अगदी तसेच रॉकेट लाँचर पुण्यातील सीओईपी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार करून दाखवले आहे. दुसऱ्या टप्प्यात ते अंतराळातील हवामानासह इतरही अंदाज वर्तवणार आहेत.महाविद्यालयात शिकताना अभ्यासक्रमाच्या बाहेरचा विचार करीत विद्यार्थ्यांनी अत्यंत कमी खर्चात स्वयंप्रेरणेने हा उपक्रम हाती घेतला अन् तो यशस्वी करून दाखवला आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे coepया महाविद्यालयातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी संघटन कौशल्य दाखवत हे रॉकेट लांचर केले. त्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतून आलेल्या शास्त्रज्ञांनी त्यांचे कौतुक करीत प्रोत्साहन दिले आहे.

कसे आहे रॉकेट लाँचर:
अवघ्या पंधरा ते वीस हजार रुपयांत विद्यार्थ्यांनी हे किट लाँचर साकारले आहे. साडेतीन फूट उंचीचे हे रॉकेट जाड पुठ्याच्या मटेरियलपासून तयार केले. ते सध्या ६०० मीटर उंचीवर जाऊ शकते. त्याच्या सर्व ट्रायल यशस्वी झाल्या आहेत. त्यात जे मशिन वापरले आहे, ते खूप वेगळे आहे. यात साखरेच्या डेरिव्हेटिव्ह पासून तयार केलेले इंधन वापरले आहे.

इग्निस व्ही – १ लाँचर:
रॉकेट लांचरला विद्याथ्र्यांनी ‘इमिस व्ही-१’ असे नाव दिले आहे. यात काळ्या रंगाचे लाँचर, छोटेसे अॅल्युमिनियमचे मशिन, लोखंडी स्टॅन्ड, इलेक्ट्रॉनिक सर्किट विद्यार्थ्यांनी अगदी कमी खर्चात म्हणजे अवघ्या पंधरा ते वीस हजार रुपयांत तयार केले. १९ जानेवारी २०२४ ला सुरुवात केली अन् वर्षभरात जानेवारी २०२५ मध्ये प्रयोग यशस्वी केला.
दोन टप्प्यांचा उपक्रम :
हा उपक्रम दोन टप्प्यांचा आहे. पहिल्या विद्यार्थ्याच्या टीमने रॉकेट अवकाशात उडविण्याची तयारी केली. त्यात एक पॅराशूट
असून, ते उंचावर जाताच रकिटमधून बाहेर आल्यावर त्याला स्थिर करण्याचे काम दुसऱ्या टप्प्यांतील टीमचे विद्यार्थी करणार आहेत. यातील यंत्रणा अवकाशातील हवामानासह इतर निरीक्षणे नोंदवणार आहे.
काय काम करणार :
पॅराशूटमधील कॅमेऱ्यावरून जीओग्राफिकल सर्व्हे करून देईल, वायू प्रदूषण, हवेचे दाब नोंदवू शकते
‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांकडून कौतुक :
दोन दिवसांपूर्वी सीओईपी महाविद्यालयात ‘इस्रो’ची स्पेस ऑन व्हील्स ही व्हॅन आली होती. त्यावेळी त्या शास्त्रज्ञांनी हा रॉकेट लाँचरचा प्रयोग पाहिला अन् विद्याथ्यांचे कौतुक केले. यावेळी डॉ. प्रकाश चव्हाण
डायरेक्टर एन.आर एस सी. हैदराबाद, डॉ. शिवकुमार शर्मा, नॅशनल ऑर्गनायझेशन सेक्रेटरी, विभा , डॉ. एन अपर्ना, डेप्युटी डायरेक्टर एम एस ए, एन आर एस सी., विवेकानंद पै, सेक्रेटरी जनरल, विभा, डॉ. पंकज प्रियदर्शनी,
प्रोजेक्ट डायरेक्टर, विक्रम साराभाई स्पेस सेंटर यांची उपस्थीती होती.यावेळी टीममधील काही विद्यार्थी भेटले यात स्वरूप शेळके, यज्ञेश नांदगावकर, समकीन जैन, रोहिणी गुल्हाणे, साकेत ठकार, अब्दुल रहेमान, धनंजय जिरेकर, वेदांत जोशी, तुषार रिंढे यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
महाविद्यालयीन स्तरावर रॉकेट लाँचर तयार करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. यापूर्वी २०१६ मध्ये सिव्हिल शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘इस्रो’ साठी उपग्रह तयार केला होता, यात दोन टप्पे आहेत. हा पहिला टप्पा पूर्ण झाला. मुलांनी अभ्यासक्रमात नसतानाही हा उपक्रम केला.
…प्रा. बी. जे. बिराजदार, सीओईपी, महाविद्यालय, पुणे
आम्ही सुमारे वीस ते पंचवीस विद्यार्थी या उपक्रमात आहोत. रॉकेटचे सर्व भाग महाविद्यालयातील कार्यशाळेतच स्वतः विद्यार्थ्यांनी तयार केले. बाहेर याचा खर्च किमान दोन-तीन लाख इतका आला असता; मात्र आम्ही खूप कमी खर्चात ते वर्षभरात मेहनत करून तयार केले.
स्वरूप शेळके, बी.ई. इलेक्ट्रिकल