पिंपरी, : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील ७ ई रिक्षा धारकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते प्रत्येकी ३० हजार रुपये अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. मागील महिन्यात देखील या ई- वाहन धोरणांतर्गत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते १२ ई – रिक्षा धारकांना अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले होते. अशा एकूण शहरात आत्तापर्यंत १९ ई- रिक्षा धारकांना अनुदान धनादेशाचे वाटप करण्यात आले.
राज्यात वाहनातून निघणाऱ्या धुरांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने २०२१ पासून राज्यात ई- वाहन धोरण राबविण्यात येत आहे. या अंतर्गत इलेक्ट्रोनिक वाहन खरेदी करणाऱ्यांना अनुदान देण्याची योजना राज्य शासनाने आखली आहे. या अंतर्गत शहरातील नागरिकांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ई – वाहन धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या ई- धोरणात सहभागी होऊन एल ५ एम , एल ५ एन, टी आर तसेच पारंपारिक वाहनांना रेट्रो इलेट्रीक किट करण्यात आलेली वाने अशा वाहनांना अनुदान देण्याची योजना राज्य शासनाची आहे. ई वाहन खरेदी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या मध्ये शहरातील ई- रिक्षा खरेदी करणाऱ्या अब्दुल कय्युम खान, सोमनाथ बाबुराव उबाळे, रोहन आनंद जाधव, गणेश बाळासाहेब गोफणे, खंडाप्पा सिद्धाराम माने, मोसिन बशीर खान, सादिक मोहम्मद उस्मान दलाल या सात जणांना आज अतिरिक्त आयुक्त इंदलकर यांच्या हस्ते अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपआयुक्त अण्णा बोदडे,कार्यकारी अभियंता कैलास दिवेकर, कनिष्ठ अभियंता सचिन मोरे यांच्यासह पत्रकार बांधव देखील उपस्थित होते.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत केंद्र
ई – वाहन धोरणांतर्गत वाहन खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असते. तसेच यासाठी वेगवेगळी कागदपत्रे देखील लागतात. एख्याद्याला अर्ज भरता येत नसेल किंवा अर्ज भरण्यात अडचणी येत असतील. अशा नागरिकांसाठी महापालिकेच्या यांत्रिकी विभागाच्या वतीने मदत केंद्र उभारण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.