पिंपरी: शालेय नेतृत्व अधिक सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अकरा मास्टर ट्रेनर्स आणि तीन पर्यवेक्षकांनी क्रिएटनेट एज्युकेशन व आकांशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण (National Training) कार्यशाळेत सहभाग घेतला. ही कार्यशाळा मध्य प्रदेशमधील होशंगाबाद येथील ‘एकलव्य’ या स्वयंसेवी संस्थेत पार पडली.

या प्रशिक्षणात संपूर्ण भारतातून एकूण ४० प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यात संजी सिखिया (पंजाब), नागपूर महानगरपालिका, दिल्ली आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दिल्लीमधील सरकारी शाळांमधील वरिष्ठ व निवृत्त मुख्याध्यापकांनी यावेळी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणात प्रामुख्याने सुलभ शिक्षण कौशल्य, परस्परसंवाद आणि सातत्यपूर्ण सहकार्य या बाबींवर भर देण्यात आला.
महापालिका शाळांमधील मुख्याध्यापकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मासिक क्लस्टर मिटींगचे नेतृत्व करणाऱ्या मास्टर ट्रेनर्सनी या प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष सहभाग घेऊन विचारमंथन सत्रे आणि एकत्रित अभिप्रायांद्वारे आपली कौशल्ये आणखी मजबूत केली.
या प्रशिक्षणादरम्यान, मास्टर ट्रेनर्सनी पिंपरी चिंचवड येथील त्यांच्या अनुभवांचे सादरीकरण केले. यात त्यांनी ‘टोटो-चान’ आणि ‘दिवसस्वप्न’ यांसारख्या प्रेरणादायी पुस्तकांवरील चर्चा, तसेच शालेय भेटींमधून आलेले अनुभव व उत्तम शैक्षणिक पद्धतींविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
विशेषतः अनुभवी मास्टर ट्रेनसर्सना पुन्हा विद्यार्थ्यांप्रमाणे शिकताना पाहणे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांनी प्रशिक्षणात सखोल नियोजनावर भर देण्यात आला आणि सुलभ शिक्षण कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी एकत्रित काम करण्यावर चर्चा केली. तसेच ठोस उपाययोजनांसह शाळांमध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा आणि शिक्षण नेतृत्वात अधिक योगदान देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.
महापालिका शाळांमधील मास्टर ट्रेनर्स मुख्याध्यापकांना सहकार्य करत असताना स्वतःही सतत नवनवीन गोष्टी शिकत आहेत आणि विकसित होत आहेत. त्यांची शिकण्याची उत्सुकता, सहकार्याची वृत्ती आणि नाविन्यापुर्ण गोष्टी शिकण्याची तयारी नक्कीच शाळांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
महापालिका शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी मास्टर ट्रेनर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रीय प्रशिक्षणातून त्यांनी घेतलेल्या शिकवणीमुळे शाळांमध्ये आधुनिक आणि प्रभावी शिक्षण पद्धतींची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल. याशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरेल.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी चिंचवड महानगरपालिका