मुंबई : अपघात झाल्यावर उपचारांसाठी पैशांची चिंता नको! सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची घोषणा केली आहे. ही सुविधा अंगीकृत आणि तातडीच्या रुग्णालयांमधून उपलब्ध होणार असून, राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुंबईतील मुख्यालयात आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनांचा आढावा घेताना मंत्री आबिटकर यांनी हा निर्णय जाहीर केला. यावेळी विविध आरोग्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:
- अंगीकृत रुग्णालयांची संख्या १७९२ वरून थेट ४१८० पर्यंत वाढविणार
- दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयात आरोग्य शिबिर घेणे अनिवार्य
- उपचारांच्या पॅकेजमध्ये महागडे उपचार व प्राथमिक सेवा समाविष्ट करण्यासाठी अभ्यास समिती
- रुग्णालयांची माहिती, बेड उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप
- आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेस गती देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार यांचा समावेश
- संबंधित कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ
मार्चपासूनच सुमारे १,३०० कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. योजनेची अंमलबजावणी पूर्ण पारदर्शकपणे होईल, गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असा इशाराही मंत्री आबिटकर यांनी दिला.