पुणे – अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, सुविधांनी अशा टेसला डायग्नोस्टिक सेंटर, प्लॅटिनम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आणि पुणे मनपाचे कै. सुभद्रा बराटे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, खासदार, राज्यसभा मेधा कुलकर्णी, आ. भीमराव तापकीर, मा. विरोधी पक्ष नेते दिलीप बराटे, भूषण कर्णावट, डॉ. अभिजीत सावळकर, डॉ. सुशांत हांडे, विनायक पुरभ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले अत्याधुनिक सेवा, सुविधा उपलब्ध असलेल्या या हॉस्पिटलमध्ये गरीब व गरजू नागरिकांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध होत आहेत ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे वारजे, कर्वेनगर आणि हवेली भागातील जास्तीत जास्त नागरिकांना याचा फायदा होईल. तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देखील मिळणार आहे.
दिलीप भाऊ बराटे म्हणाले, वैद्यकीय सेवा सुविधांनी परिपूर्ण असे हॉस्पिटल आजपासून नागरिकांच्या सेवेत येत आहे. मोफत व अल्प दरात मिळणाऱ्या उपचारांचा लाभ नागरिकांनी घ्यावा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ देखील घेऊ शकणार आहेत.
आयुष्मान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजना, पुणे मनपा शहरी गरीब योजना, पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, लहान मुलांचे एनआयसीयु व बाळंतपणा साठीची सुविधा, हाडांच्या विकाराची सुविधा आदींचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. वैद्यकीय सेवांनी उपयुक्त असलेल्या हॉस्पिटलमध्ये एम आर आय 3T, सिटीस्कॅन अल्प दरात करून मिळणार आहे, अशी माहिती प्रमुख रेडिओलॉजिस्ट डॉ. अभिजीत सावळकर आणि डॉ. सुशांत हांडे यांनी दिली.