पिंपरी,- : महिलांच्या योगदानाचा सन्मान व्हावा तसेच त्यांच्या सक्षमीकरण आणि सशक्तीकरणासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा करणे महत्वाचे आहे. सर्व महिला वर्गाने एकत्र येऊन समानता आणि न्यायाच्या दिशेने काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक महिला स्वतंत्र, सुरक्षित आणि सशक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले तसेच सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर नाट्यगृह येथे जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास उपआयुक्त संदीप खोत, सिताराम बहुरे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा उज्वला गोडसे, लेखाधिकारी चारुशीला जोशी, प्रशासन अधिकारी साधना बोर्डे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता अनघा पाठक, वैशाली ननवरे, संध्या वाघ, जाहिरा मोमीन, अनुश्री कुंभार, लघुलेखक सुनिता पळसकर, वैशाली गायकवाड यांच्यासह कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे, संघटिका शुभांगी चव्हाण, रुपाली कड, माध्यमिक शिक्षण पतसंस्थेच्या चेअरमन सुरेखा मोरे तसेच अधिकारी कर्मचारी तसेच महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजचा दिवस केवळ महिलांच्या सशक्तीकरणासाठीच नसून त्यांची प्रेरणा आणि त्यांचे योगदान समाजाच्या सर्व अंगांमध्ये समाविष्ट करण्यासाठी महत्वपूर्ण संदेश आहे. महिला वर्गाने घर, संसार, ऑफिस सांभाळून आपल्या अंगातील कलागुणांना वाव द्यायला हवा, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले.
या कार्यक्रमाची सुरुवात महापालिकेच्या कर्मचारी महिलांच्या गुणदर्शन कार्यक्रमाने करण्यात आली. यामध्ये स्थापत्य विभागाच्या महिला कर्मचारी वर्गाने शिवकन्या या गाण्यावर समुह नृत्य सादर केले. तर लेखा विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी पैठणीचा फॅशन शो करून उपस्थितांची मने जिंकली तसेच सोलो डान्स देखील यावेळी महिलांनी सादर केला.
या कार्यक्रमावेळी महापालिकेच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपोलो रुग्णालय यांच्या वतीने मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.रुपाली चौधरी आणि अदिती मोगरे यांनी महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तर डॉ. केतकी मोहिते यांनी हाडांची घनता याबाबत माहिती दिली. तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी सुमारे ३०० महिलांनी आरोग्य तपासणी केली.
सिल्वर एड्ज युटोपियन संस्थेच्या अध्यक्ष पिनल वानखेडे, अपोलो क्लिनिकच्या डॉ. प्राची देवरे, डॉ. केतकी मोहिते, डॉ. रुपाली चौधरी, अदिती मोगरे यांचा देखील सन्मान अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमासाठी लेखाधिकारी चारूशीला जोशी, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, मुख्य लिपिक संजय घुले, लिपिक रितिका बिडकर, आरती खैरे, पियुषा बिराडे, श्रुती कदम, सुनिता दिलोत, अरविंद कांबळे, रत्नाकर कणसे, रोहित डोईफोडे, नंदकुमार इंदलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्रात महापालिकेच्या महिलांसाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चारुशीला जोशी यांनी तर सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक आणि विजया सोळंके यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार प्रमोद जगताप यांनी मानले.