- पुणे: शाहिरी जलसा, संविधान उद्देशिकेचे वाचन, आंबेडकरी काव्याची मैफल, व्याख्यानांतून उलगडलेले आंबेडकर, विविध चर्चासत्र व परिसंवाद, माणुसकीप्रती करू रक्तदान उपक्रमांतून रक्त पिशव्यांचे संकलन अशा विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतून सलग २४ तास आंबेडकरी विचारांचा जागर करीत रुग्ण हक्क परिषदेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन केले. रक्तदान शिबिरात ७१५ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रुग्ण हक्क परिषदेने पुणे स्टेशन येथील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात आंबेडकरी विचारांचा जागर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे हे ११ वे वर्षे होते. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे प्रमुख उमेश चव्हाण, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, माजी सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, अपर्णा साठे, दिलीप साळुंके, आशिष गांधी आदी उपस्थित होते.
या उपक्रमाला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ऍड. जयदेव गायकवाड, डॉ. अमोल देवळेकर, रिपब्लिकन पक्षाचे शैलेंद्र चव्हाण, असित गांगुर्डे, विशाल शेवाळे आदींनी भेट दिली. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला प्रसिद्ध गायक राहुल शिंदे आणि कलाविकास संघ सहकार्यांनी आदरांजलीपर वैचारिक गीते सादर केली. हा कार्यक्रम आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायांच्या सहभागाने आयोजित केला जातो.
उमेश चव्हाण म्हणाले, “पुण्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरे होणे गरजेचे आहे. आम्ही गेल्या ११ वर्षांपासून रक्तदान शिबीर आयोजित करतो. बाबासाहेबांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांना अभिवादन करण्यासाठी रक्तदानासारखा दुसरा चांगला उपक्रम नाही. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भीमगीतांची मैफल, व्याख्यानांमुळे आंबेडकरांचे जीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.”