परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले : अखिल मंडई मंडळाच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘कृतज्ञता सन्मान सोहळा’
पुणे : गणपती विसर्जनाच्या उत्साही सोहळ्यानंतर जी स्वच्छता आपल्याला दिसते ती आपोआप होत नाही. त्याच्या मागे सफाई कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस केलेली मेहनत असते. पावसामुळे झालेली घाण, दुर्गंधी, कचरा यांना तोंड देत पहाटेपासून त्यांचे काम सुरू होते. त्यांच्याकडून होणारे शहर स्वच्छ ठेवण्याचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या श्रमाचा मान राखून सफाई कर्मचाऱ्यांचा आपण आदर करायला हवा, शहराचे ते खरे हिरो आहेत, असे मत परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी व्यक्त केले.
अखिल मंडई मंडळाच्यावतीने गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणूकीनंतर शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेशोत्सवातील सजीव देखावा क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान देखील करण्यात आला. लोकमान्य सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर, विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, सचिव विश्वास भोर, देविदास बहिरट, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, राजेश कराळे, तुषार शिंदे, सुरज थोरात, विकी खन्ना, नारायण चांदणे यावेळी उपस्थित होते. भेटवस्तू, मानाचे उपरणे, मिठाईचा डबा असे सन्मानाचे स्वरूप होते.
किरण ठाकूर म्हणाले, पुण्याचा गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. सण हे केवळ उत्साहाचे नव्हे तर राष्ट्रभक्ती जागवण्याचे माध्यम आहेत. हिंदुस्तान विश्वरूप बनण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आज दुर्दैवाने सुशिक्षित लोकसुद्धा रस्त्यावर कचरा करतात. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
अण्णा थोरात म्हणाले, विसर्जन मिरवणुकीनंतर शहरात कचऱ्याचे साम्राज्य दिसते. रस्त्यांवर फुलांचे हार, प्लास्टिक व खाण्याची पाकिटे, रिकाम्या बाटल्या पडलेले दिसतात मात्र, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कष्टामुळे काही तासांतच पुण्याचे रस्ते पुन्हा चकचकीत होतात. या कर्मवीरांचा सन्मान राखणे आणि त्यांचे मनापासून आभार मानणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.