पुणे: प्लास्टिक वाईट असल्याचे मत अयोग्य असून प्लास्टिक हे उपयोगी उत्पादन आहे. मात्र प्रदूषण नियंत्रणासाठी त्याचा पुनर्वापर आवश्यक आहे, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी व्यक्त केले.
एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पर्यावरण क्षेत्रातील ‘पर्यावरण जीवन गौरव’ ,’पर्यावरण भूषण’आणि ‘पर्यावरण गौरव’ पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि विश्वेश्वर बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र मिरजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एन्व्हायरमेंटल क्लबचे अध्यक्ष आमोद घमंडे, सचिव गणेश शिरोडे आणि खजिनदार सचिन पाटील, पदाधिकारी,सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गणपतराव पाटील यांना पर्यावरण ‘जीवनगौरव पुरस्कार’ तर
पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांना ‘पर्यावरण भूषण’ पुरस्कार प्रदान करून पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना सिद्धेश कदम म्हणाले की, पर्यावरण संरक्षण क्षेत्रात प्लास्टिकला खलनायक ठरवले असले तरी देखील प्लास्टिक ही उपयुक्त वस्तू आहे. मात्र त्याचे प्रक्रिया करून पुनर्वापर आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात प्लास्टिक वर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची कदम यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे देण्याबरोबरच शेती बाबतचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या मातीचे परीक्षण करण्यात आले. त्यानुसार उपाय योजना करून प्रति एकर 100 टन उत्पादन घेण्यात यश आले आहे, असे पर्यावरण ‘जीवनगौरव पुरस्कार’ विजेते गणपतराव पाटील यांनी सांगितले. शास्त्रीय उपाययोजना करून तालुक्यातील क्षारपड जमीन सुपीक करण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत सन 2047 साली शंभर वर्षे पूर्ण करत आहे. या काळात मोठी आर्थिक प्रगती करून 30 अब्ज अमेरिकन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. मात्र, नागरिकांनी निर्धार केल्यास हे ध्येय गाठण्यासाठी 2047 साल गाठावे लागणार नाही, असा विश्वास ‘पर्यावरण भूषण’ पुरस्कार विजेते डॉ. जी. डी. यादव यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात ‘पर्यावरण गौरव’ पुरस्कारार्थी मध्ये स्वतः भूलतज्ञ असून देखील सियाचीन आणि चंद्रपूर येथे घरांच्या उभारणीत टाकाऊ प्लास्टिकचा वापर करण्यासाठी पुढाकार घेणारे डॉ. बालमुकुंद पालीवाल, पर्यावरण प्रकल्पांना सीएसआर अंतर्गत निधी प्रदान करून प्रोत्साहन देणारे राजेश जैन, जैविक खत प्रकल्प तज्ञ आणि पर्यावरण प्रयोगशाळेचे प्रवर्तक प्रसाद घळसासी, पर्यावरण शिक्षक प्रदीपसिंग पाटील, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनचे डॉ. राजेश मणेरीकर, इको- फॅक्टरी फाउंडेशनचे आदी आनंद चोरडिया, पाणी व्यवस्थापन प्रकल्प तज्ञ वास्तुविशारद ज्योती पानसे, रंकाळा परिसराच्या स्वच्छतेसाठी कार्य करणारे अमर जाधव, इको प्रेरणा फाउंडेशनचे ऋषिकेश कुलकर्णी, विलो इंडिया मॅथर एंड प्लांट आणि किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी यांना मानपत्र,उपरणे आणि स्मृतिचिन्ह असे ‘पर्यावरण गौरव’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध कुलकर्णी यांनी केले आणि आभार सचिन पाटील यांनी मानले.