▪️ *दीड लाखाहून अधिक नागरिकांची जिल्ह्यात आरोग्य तपासणी
पुणे, -: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान ‘श्री गणेशा आरोग्याचा’ आरोग्य अभियान २०२५ राबविण्यात आले; या अभिनयात एकूण १ लाख ६५ हजार ७१८ महिला व पुरुषांनी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कालावधीत सुमारे २ हजार ५२५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याममध्ये ४ हजार ३०४ नागरिकांचे रक्तदान,५ हजार २५५ नागरिकांची आयुष्यमान कार्ड नोंदणी, ३ हजार ६१३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.

या शिबिरांत नेत्ररोग, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, महिलांचे आरोग्य, रक्त तपासणी, सर्वरोग निदान, रक्तदान शिबिरे तसेच आजाराविषयी मार्गदर्शन व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यासोबतच लाभार्थींना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले.
या अभियानाचा उद्देश “गणेशोत्सव साजरा करताना आरोग्याची काळजी” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे आणि प्रत्येक नागरिकाला प्राथमिक तपासणी व उपचाराची संध उपलब्ध करून देणे हा होता.
या अभियानात पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, नगरपरिषद, महानगरपालिका तसेच शासकीय आरोग्य यंत्रणा, एमजेपीजेएवाय, सीएमआरएफ व धर्मादाय रुग्णालयांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे जिल्हा समनव्यक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांनी दिली आहे.