मुंबई: जगाला पुन्हा चिंतेत टाकणाऱ्या कोविड-१९ च्या जेएन.१ (JN.1) या नव्या व्हेरिएंटचा धोका आता महाराष्ट्रावरही घोंघावतोय. यापूर्वीच्या कोरोना लाटांनी जगभरात हाहाकार माजवला होता, लॉकडाऊनने जनजीवन थांबले होते आणि लाखो लोक मृत्यूमुखी पडले होते. आता थायलंडमध्ये ३३ हजारांहून अधिक, तर ब्रिटनमध्ये मृत्यूंची संख्या सर्वाधिक असल्याची नोंद असताना, भारतातही या नव्या उपप्रकाराची प्रकरणे आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
जेएन.१ हा ओमिक्रॉनचा उपप्रकार असून, त्याचा संसर्ग दर जास्त असल्याचे आरोग्य तज्ञांनी म्हटले आहे. ताप, खोकला, थकवा ही या व्हेरिएंटची प्रमुख लक्षणे आहेत. भारतात सध्या एकूण २५७ सक्रिय रुग्ण असून, केरळमध्ये सर्वाधिक ६९, तर महाराष्ट्रात ५७ सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तामिळनाडूमध्येही ३४ प्रकरणे आहेत.
या पार्श्वभूमीवर, आरोग्य तज्ञांनी नागरिकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आणि पुरेपूर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, नियमितपणे हात स्वच्छ ठेवणे आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडसारख्या देशांमध्येही या व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. भारतातही परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी आणि आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.