पुणे : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष (२०२५) निमित्ताने पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आंतरसहकारी बँक ‘सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा २०२५’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२ ते ९ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष रमेश वाणी, मानद सचिव अॅ’ड. सुभाष मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके, दीपक घाडगे, अजय राजपूत उपस्थित होते.
या स्पर्धेतील सामने स्वारगेट येथील पंडीत नेहरू क्रिकेट स्टेडियम आणि सहकारनगरमधील शिंदे हायस्कूल मैदानावर होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता नेहरू स्टेडीयम येथे होणार आहे. स्पर्धेत एकूण १५ बँकांचा सहभाग आहे. यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे.
स्पर्धेतील सर्व सामने १० षटकांचे होणार आहेत. सर्व सामने लाल रंगाच्या लेदर चेंडूवर खेळविले जातील. विजेत्या संघाला रोख २५ हजार रुपये व चषक आणि उपविज्येत्या संघाला रोख १५ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसह सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर अशी वैयक्तिक पारितोषिकेही दिली जाणार आहेत. तर सहकारी बँक सहकार करंडक महिला बॉक्स क्रिकेट स्पर्धा देखील होणार आहे. यामध्ये ६ षटकांचे सामने होतील. सर्व खेळाडू बँकेच्या सेवेत मागील दोन वर्षे किंवा कायम स्वरूपी असावेत, अशी अट घालण्यात आली आहे.
स्पर्धेत दि कॉसमॉस बँक, पिंपरी-चिंचवडची धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप. बँक, जनता सहकारी बँक, महेश सहकारी बँक, प्रेरणा को-ऑप बँक, पुणे पिपल्स बँक, पुणे अर्बन बँक, राजगुरूनगर सहकारी बँक, राजर्षि शाहू सहकारी बँक, साधना सहकारी बँक, संपदा सहकारी बँक, संत सोपानकाका सहकारी बँक, दि विश्वेश्वर सहकारी बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सन्मित्र सहकारी बँक यांचा सहभाग असणार आहे. स्पर्धेची अंतिम लढत ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता नेहरू स्टेडियमवर होणार आहे. श्री शिवाजीभाई ढमढेरे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने नेहरू स्टेडियम उपलब्ध करून देण्यात आले आहे.


