पुणे : महाराष्ट्र प्रीमियर लीग चे दोन वेळा विजेते ठरलेले रत्नागिरी जेट्स आणि चितळे बंधू यांच्यातील नवीन धोरणात्मक भागीदारीची घोषणा करताना जेटसिंथेसिसला आनंद होत आहे. पुणे येथे योजण्यात आलेल्या ‘रत्नागिरी जेट्स रिंग सेरेमनी’ दरम्यान या तीन वर्षांच्या भागीदारीची घोषणा करण्यात आली. या प्रसंगी आनंद साजरा करण्यासाठी आणि सहवासाचा आनंद घेण्यासाठी खेळाडू, प्रायोजक आणि समर्थक उपस्थित होते.
आपल्या टीमप्रति निरंतर निष्ठा दाखवत, जेटसिंथेसिसने रत्नागिरी जेट्सच्या खेळाडूंना प्रतिष्ठित चॅम्पियनशिप रिंग आणि एक कोटी रु. पुरस्कार म्हणून दिले. ही रक्कम मागील वर्षापेक्षा दुप्पट आहे. या कृतीमधून खेळाडूंना प्रोत्साहन तर मिळतेच, शिवाय त्यांच्या यशात गुंतवणूक करण्याचा मालकाचा विश्वास देखील दिसून येतो. रत्नागिरी जेट्सशी प्रदीर्घ काळापासून संलग्न असलेल्या फ्लीटगार्ड फिल्ट्रम प्रमाणेच चितळे बंधू देखील जेटसिंथेसिसच्या सहयोगाने महाराष्ट्र क्रिकेटची भरभराट व्हावी यासाठी हातभार लावण्यास कटिबद्ध आहेत.
टीमचा विजय आणि भागीदारीविषयी बोलताना जेटसिंथेसिसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन नवानी म्हणाले, “महाराष्ट्रात स्थानिक प्रतिभांचे संगोपन करण्याची आमची वचनबद्धता अढळ आहे. क्रिकेटच्या तळागाळातल्या स्तरावर गुंतवणूक करून आम्ही या खेळाची इकोसिस्टम मजबूत करू पाहतो आहोत आणि या प्रदेशात अनेक रोजगार संधी निर्माण करू इच्छितो आहोत. सतत दुसरे वर्ष एमपीएल मधील विजयश्री हा आमच्या खेळाडूंच्या परिश्रमाचा आणि त्यांच्या निष्ठेचा पुरावा आहे. आणि त्यांच्या विकासात मदत करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. चितळे बंधू आणि फ्लीटगार्ड फिल्ट्रमची भागीदारी आमच्यासाठी खूप मोलाची आहे, ज्यांच्यामुळे क्रिकेट समुदायात रत्नागिरी जेट्सच्या क्षमता आणि मान आणखीन वाढणार आहे.”
त्याला पुस्ती जोडत जेटलाइन ग्रुप ऑफ कंपनीजचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी राकेश नवानी म्हणाले, “या टीमने पाठोपाठ दोन वर्षी चॅम्पियनशिप जिंकणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा मोठा टप्पा गाठताना त्याच्या पाठीशी असलेले मुख्य कोच, इतर कोच, सपोर्ट स्टाफ, राजन (नवानी) आणि सगळ्या खेळाडूंचे अथक प्रयत्न आणि योगदान याचे आम्ही कौतुक करतो. महाराष्ट्राच्या तळागाळातील क्रिकेटला आधार देण्याचे महत्त्व या विजयातून अधोरेखित होते. या आनंद सोहळ्यात टीमच्या अथक प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले आणि या टीममध्ये हित असलेल्या सर्वांना खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र येण्याची संधी मिळाली.”
या नवीन भागीदारीसह रत्नागिरी जेट्स, महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील एक प्रबळ ताकद म्हणून आपली विजयी घोडदौड पुढे चालू राखण्यासाठी सज्ज आहे.