पुणे,- पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत प्रज्योत शिरोडकर याने फटकावलेल्या नाबाद ६० धावा आणि प्रसाद घारे (नाबाद ४२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर रमणबाग फायटर्स संघाने रंगारी रॉयल्स् संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला आणि स्पर्धेच्या विजेतेपदावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले.
सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना रंगारी रॉयल्स् संघाने १० षटकामध्ये १०३ धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये स्पर्धेचा सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरलेला निलेश साळुंखे याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६३ धावांची खेळी केली. त्याला विशाल मुधोळकर याने १६ धावा करून साथ दिली. हे लक्ष्य रमणबाग फायटर्स संघाने ७.२ षटकात व एकही फलंदाज न गमवता पूर्ण केले. सामन्याच्या दुसर्या डावामध्ये वर्चस्व गाजवताना रमणबाग संघाच्या प्रज्योत शिरोडकर याने २० चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६० धावाची खेळी केली. प्रसाद घारे याने दुसर्या बाजुने नाबाद ४२ धावांची खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुनित बालन ग्रुपचे संचालक आणि स्पर्धेचे आयोजक श्री. पुनितदादा बालन, माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन आणि प्रसिध्द सिनेचित्रपट अभिनेता आकाश ठोसर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळांचे अध्यक्ष, मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, ढोल-ताशा पथकातील सदस्य, मीडिया क्षेत्रातील मान्यवर सदस्य व सहभागी संघ आणि संघातील खेळाडू आदि उपस्थित होते.
विजेत्या रमणबाग फायटर्स संघाला २ लाख ११ हजार रूपये, करंडक व मेडल्स् तर, उपविजेत्या रंगारी रॉयल्स् संघाला १ लाख ११ हजार रूपये, करंडक आणि मेडल्स् देण्यात आले. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू निलेश साळुंखे याला ५१ हजार रूपये आणि इलेक्ट्रिक बाईक देण्यात आली. ‘फेअर प्ले’ पुरस्कार जिंकणार्या युवा योद्धाज् संघ संघाला २५ हजार रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. याबरोबरच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज- रूपक तुबाजी, गोलंदाज- सत्यजीत पाळे, यष्टीरक्षक- मयुरेश चासकर, क्षेत्ररक्षक- विशाल मुधोळकर आणि सर्वोत्कृष्ठ ५० वर्षावरील खेळाडू- संतोष गायकवाड या सर्वांना प्रत्येकी ११ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.
अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
रंगारी रॉयल्स्ः १० षटकात ६ गडी बाद १०३ धावा (निलेश साळुंखे ६२ (३५, ७ चौकार, ३ षटकार), विशाल मुधोळकर १६, अथर्व हिरवे ३-२, प्रज्योत शिरोडकर १-११) पराभूत वि. रमणबाग फायटर्सः ७.२ षटकात बिनबाद १०४ धावा (प्रज्योत शिरोडकर नाबाद ६० (२०, ६ चौकार, ४ षटकार), प्रसाद घारे नाबाद ४२ (२५, ३ चौकार, ३ षटकार); सामनावीरः प्रज्योत शिरोडकर;
स्पर्धेची वैयक्तिक आणि इतर पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूः निलेश साळुंखे (१५१ धावा, ७ विकेट; रंगारी रॉयल्स्);
सर्वोत्कृष्ठ फलंदाजः रूपक तुबाजी (२५३ धावा, शिवमुद्रा ब्लास्टर्स);
सर्वोत्कृष्ठ गोलंदाजः सत्यजीत पाळे (१० विकेट, रमणबाग फायटर्स);
सर्वोत्कृष्ठ क्षेत्ररक्षकः विशाल मुधोळकर (रंगारी रॉयल्स्);
सर्वोत्कृष्ठ यष्टीरक्षकः मयुरेश चासकर (१२ बाद; रमणबाग फायटर्स);
सर्वोत्कृष्ठ ५० वर्षावरील खेळाडूः संतोष गायकवाड (गजर सुपरनोव्हा);
फेअर प्ले पुरस्कारः युवा योद्धाज् संघ;