शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर, शुक्रवारी पुण्यात समारंभ
शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव, सचिन खिलारी, आदिती स्वामी, ओजस देवतळे यांना थेट पुरस्कार
मुंबई : सन 2023-24 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा (Shiv Chhatrapati Sports Awards) पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंत्रालयात केली. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागितिक विजेते आर्चर आदिती स्वामी,ओजस देवतळे , क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने गौरवित केले जाणार आहे. एकूण 89 पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.
पुण्यात शुक्रवार 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार समारंभ होईल. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधान सभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे. अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सन 2022-23 व 2023-24 (Maharashtra Sports Awards 2023-24) अश्या दोन वर्षांच्या पुरस्कार समारंभाची तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली आहे.
मुंबईत आज शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक-जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार ,दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे एकूण 89 पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 18 खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करणयात येणार आहे. जीवन गौरवसाठी 5 लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी 3 लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे.
पुरस्कराच्या घोषणेनंतर मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची गौरवशाली परंपरा आहे. पुण्यात दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार देण्यात येणार आहे.
2001 पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा (Sports lifetime achievement award India) जीवनगौरव पुरस्काराची परंपरा सुरू झाली. पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. 1979 ते 1982 कालावधीत 106 राष्ट्रीय कबड्डी लढती खेळण्याचा विक्रम खटावकर यांनी केला होता. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल 8 वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. 1978 मध्ये केंद्र शासनाच्या अर्जून पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.